सनरायझर्स हैदराबादच्या ड्रेसिंग रूममधील हृदयस्पर्शी किस्सा चर्चेत
ईशान किशनचा भाईचारा : आयपीएल 2026 मध्ये मैदानावरील थरारासोबतच काही भावनिक आणि प्रेरणादायी किस्सेही चाहत्यांच्या मनाला भिडताना दिसत आहेत. सनरायझर्स हैदराबादचा स्टार विकेटकिपर फलंदाज ईशान किशन आणि युवा वेगवान गोलंदाज साकिब हुसैन यांच्याशी संबंधित एक अशीच हृदयस्पर्शी घटना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गरीबीशी संघर्ष करत क्रिकेटमध्ये स्थान निर्माण करणाऱ्या साकिब हुसैनला ईशान किशनने तब्बल 6 महागड्या शूजच्या जोड्या गिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, एक काळ असा होता की साकिबकडे क्रिकेट खेळण्यासाठी साधे बूट खरेदी करण्याइतकेही पैसे नव्हते. त्याच्या आईने स्वतःचे लग्नातील दागिने विकून मुलासाठी बूट घेतले होते. आता त्याच खेळाडूला भारतीय स्टार क्रिकेटरकडून लाखमोलाचा सन्मान मिळाल्याने क्रिकेटविश्वात या भाईचार्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
साकिब हुसैनची आयपीएलमध्ये दमदार एन्ट्री
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या साकिब हुसैनने आयपीएल 2026 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. पदार्पण सामन्यातच त्याने चार विकेट घेत सनसनाटी कामगिरी केली होती. त्यानंतर सलग सुरुवातीच्या 10 सामन्यांमध्ये विकेट घेण्याचा विक्रम त्याने केला. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
Related News
या हंगामात साकिबने 11 सामन्यांत 15 विकेट घेत आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या अचूक लाईन-लेंथ आणि वेगवान माऱ्यामुळे अनेक मोठे फलंदाज अडचणीत आले.
ईशान किशनने दिल्या 6 महागड्या शूजच्या जोड्या
भारतीय विकेटकिपर फलंदाज ईशान किशन सुद्धा या सीजनमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचा भाग आहे. संघातील सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण नातं ठेवणारा ईशान मैदानाबाहेरही मोठ्या मनाचा असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं.
साकिब हुसैनने एका मुलाखतीत सांगितलं की, ईशान किशनने त्याला तब्बल 6 जोड्या शूज गिफ्ट केल्या. हे शूज ॲडिडासच्या ‘Adipower’ मालिकेतील असल्याचं सांगितलं जात आहे. सध्या साकिब आयपीएलमध्ये तेच शूज वापरत खेळताना दिसत आहे.
साकिब म्हणाला, “एक वेळ अशी होती की माझ्याकडे बूट खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. 12 ते 15 हजार रुपयांचे शूज घालण्याचा मी विचारही करू शकत नव्हतो. पण आज मला ईशान भाईने इतक्या महागड्या शूजच्या जोड्या गिफ्ट केल्या, हे माझ्यासाठी स्वप्नासारखं आहे.”
आईने विकले होते लग्नातील दागिने
साकिब हुसैनचा संघर्ष अत्यंत भावनिक आहे. क्रिकेट खेळण्याची जिद्द असलेल्या साकिबकडे योग्य साधनं नव्हती. एका स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला चांगल्या बुटांची गरज होती, मात्र घरची परिस्थिती हलाखीची होती.
त्यावेळी त्याच्या आईने स्वतःचे लग्नातील दागिने विकून मुलासाठी क्रिकेटचे बूट खरेदी केले. साकिबने मुलाखतीदरम्यान हा प्रसंग सांगताना भावना व्यक्त केल्या.
तो म्हणाला, “आईने माझ्यासाठी खूप त्याग केला आहे. तिच्या त्यागामुळेच आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तिचे दागिने विकून घेतलेले बूट आजही माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेत.”
टेनिस बॉल क्रिकेटपासून IPL पर्यंतचा प्रवास
साकिब हुसैनचा क्रिकेट प्रवास प्रेरणादायी आहे. त्याने सुरुवातीला टेनिस बॉल क्रिकेट खेळून स्वतःची ओळख निर्माण केली. गावोगावी सामने खेळून तो घरखर्चालाही हातभार लावत होता.
त्याने सांगितलं की, “आम्हाला प्रत्येक सामन्यासाठी 300 रुपये मिळायचे. जर लांब प्रवास करून सामना खेळायला गेलो तर 1000 ते 1200 रुपये मिळायचे. त्या पैशातूनच आम्ही क्रिकेट आणि घर दोन्ही सांभाळत होतो.”
त्याच्या मेहनतीची दखल घेत सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2026 च्या लिलावात 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर त्याला आपल्या संघात घेतलं. यापूर्वी तो कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात होता, मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
सोशल मीडियावर ईशान किशनचं कौतुक
संघर्षातून उभा राहिलेला स्टार
आज साकिब हुसैन आयपीएलमध्ये चमकत असला तरी त्यामागे प्रचंड संघर्ष आणि मेहनत आहे. गरीब परिस्थितीतून आलेल्या या खेळाडूने हार न मानता सातत्याने मेहनत घेतली. त्याच्या आई-वडिलांच्या त्यागामुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे तो आज भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा बनला आहे.
ईशान किशनने केलेली मदत ही फक्त शूजची भेट नाही, तर एका संघर्ष करणाऱ्या खेळाडूच्या मेहनतीला दिलेली दाद आहे. त्यामुळेच हा किस्सा लाखो क्रिकेट चाहत्यांच्या मनाला भिडताना दिसत आहे.
