अवैध बॅनरचा सुळसुळाट

अपघाताला निमंत्रण, पालिकेच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह

अकोट : अकोट शहरामध्ये सर्वत्र अवैध बॅनरचा सुळसुळाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या दुभाजकावर, विद्युत खांबांवर व मुख्य चौकांमध्ये हे बॅनर लावले जात आहेत. यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होत आहे.

अपघाताला आमंत्रण:अकोला नाका ते शिवाजी महाराज चौक ते न्यायालयापर्यंतच्या रस्त्यावर नगरपालिकेने लावलेले विद्युत खांब हे सध्या अवैध बॅनरच्या ओझ्याखाली दबले आहेत. या बॅनरमुळे वाहनचालकांना अडथळा निर्माण होत असून, बॅनरचे कडे लागून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे केव्हाही जीवितहानी होऊ शकते, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

नागरिकांचा आक्रोश:अवैध बॅनर आणि होर्डिंगवर नगरपालिकेने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. शहरवासीयांनी पालिकेकडे अवैध बॅनर तातडीने हटवून, त्यांना लावणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पालिकेचा दावा:या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना अकोट नगरपरिषदेमधील विद्युत अभियंता आकाश आहेर यांनी सांगितले की,“विद्युत खांबांवर बॅनर लावण्याची पालिकेकडून कोणतीही परवानगी दिलेली नाही. अवैध बॅनर हटविण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, बॅनर लावणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईही करण्यात येत आहे.”

अकोट शहरात दिवसेंदिवस वाढणारे अवैध बॅनर हे केवळ दृश्य प्रदूषण नव्हे तर गंभीर अपघाताचे कारण ठरू शकतात. नागरिकांच्या सुरक्षेला तडा जाऊ नये, यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

read also :https://ajinkyabharat.com/ancestor/