मुंबई- मराठा आरक्षणासाठी झालेल्या प्रचंड आंदोलनानंतर अखेर राज्य
सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला.
ज्या क्षणी यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) मनोज जरांगे पाटील यांच्या हातात ठेवला गेला,
त्याच क्षणी त्यांनी उपोषण मागे घेतल्याची घोषणा केली.
गॅझेट लागू झाल्यानं मराठवाड्यातील मराठ्यांच्या अनेक वर्षांच्या आरक्षण लढ्याला नवी दिशा मिळाली आहे.
परंतु याच जीआरवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून,
त्याला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत.
“हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत…”
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला.
ते म्हणाले, “ज्यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांनाच जीआरमध्ये त्रुटी शोधायचं काम सुरू आहे.
हे लोक कधीच आपल्या बाजून बोललेले नाहीत.
उलट मराठा समाजाचं नुकसान व्हावं, यासाठीच सतत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे.”
जीआरतील शब्दांवरून निर्माण झालेली चिंता
जीआरमधील काही शब्दांमुळे गोंधळ उडाल्याचं मान्य करताना जरांगे पाटील म्हणाले,
“एखाद्या शब्दात घोळ झाला असेल तर ते बदलण्याचा शब्द सरकारनं आम्हाला दिला आहे.
त्यामुळे समाजानं संभ्रमात राहू नये. गॅझेटचा पूर्ण फायदा सामान्य मराठा समाजाला मिळणार आहे.”
हैदराबाद गॅझेटमुळे दिलासा
हैदराबाद गॅझेटच्या आधारे मिळणाऱ्या नोंदींमुळे मराठवाड्यातील प्रत्येक मराठा
सामाजिकदृष्ट्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होऊ शकतो.
त्यांना शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचा थेट लाभ मिळणार आहे.
“मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही.
हे लक्षात ठेवा आणि निर्धास्त राहा,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
“७० वर्षांत काही दिलेलं नाही; मी समाजाला काही दिलं”
विरोधकांवर जोरदार टीका करत त्यांनी म्हटलं —“जे आज सोशल मीडियावर दिशाभूल करत आहेत,
त्यांनी गेल्या ७० वर्षांत मराठा समाजाला काहीच दिलं नाही.
पण मी समाजाला किमान काही दिलं आहे. म्हणूनच आज समाज आनंदी आहे,
मीही आनंदी आहे. विरोधक काय बोलतात याला काही अर्थ नाही.”
हैदराबाद गॅझेटचा जीआर जाहीर झाल्यानंतर मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे.
मात्र काही राजकीय भूमिका आणि जीआरमधील तांत्रिक
बाबींवरून निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे वादाचे ढगही दाटले आहेत.
यावर जरांगे पाटील ठामपणे म्हणतात की, “सरकारने दिलेला शब्द पक्का आहे.
मराठवाड्यातील मराठे आता ओबीसी प्रवर्गात जाणारच. गोंधळ निर्माण करणाऱ्या प्रचाराला बळी पडू नका.”
Read also : https://ajinkyabharat.com/bordit-ganeshotsav-shantate-paar-pada-polisankdoon-guidance/