HSRP number plate बसवण्यासाठी यापुढे मुदतवाढ नाही, थेट होणार कारवाई!

HSRP number plate बसवण्यासाठी यापुढे मुदतवाढ नाही, थेट होणार कारवाई!

वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. वेळेत प्लेट बसवून घ्या अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.वाहनधारकांनो लक्ष द्या! तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात येणार नाही. तुमच्याकडे केवळ १० दिवस शिल्लक आहेत. ही शेवटची संधी असणार आहे. परिवहन विभागाने १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिकांना मुदत दिली आहे. पण यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, मुदतीच्या आत नंबर प्लेट बसवून घ्या, अन्यथा थेट दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.मुदतवाढीमागे नेमकी कारणे काय?

यापूर्वी एप्रिल अखेर त्यानंतर जून अखेर आणि आता 15 ऑगस्टपर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र या पुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेला हवा तसा वेग मिळालेला नाही. कोट्यवधी वाहनांसाठी प्लेट्सची मर्यादित उपलब्धता, ऑनलाइन बुकिंगमधील तांत्रिक अडचणी, फिटमेंट सेंटरवरील प्रचंड गर्दी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या मर्यादा, यामुळे अनेकांना नंबर प्लेट बसवण्यात अडचणी येत होत्या. काही ठिकाणी प्लेट्स मिळण्यास उशीर होत होता,तर काहींना ऑनलाइन नोंदणी करतानाही त्रास सहन करावा लागला. या सर्व अडचणींमुळेच ही तिसरी आणि अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.