घर खरेदीदारांना धक्का : एसबीआयने गृहकर्ज व्याजदर वाढवले
मुंबई : देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) हिने गृहकर्जावरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे घर खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.
पूर्वी SBI च्या गृहकर्ज व्याजदराची मर्यादा 7.50 टक्के ते 8.45 टक्के इतकी होती. मात्र आता ती 7.50 टक्के ते 8.70 टक्के इतकी करण्यात आली आहे.
खालची मर्यादा कायम ठेवून वरच्या व्याजदराची मर्यादा 25 बेसिस पॉइंट्सने वाढवली आहे.
या निर्णयाचा फटका विशेषतः ज्यांचा क्रेडिट स्कोअर कमी आहे अशा ग्राहकांना बसणार आहे.
फक्त नवीन ग्राहकांना लागू
बँकेच्या या नव्या व्याजदरांचा परिणाम फक्त नवीन गृहकर्ज ग्राहकांवर होणार आहे. आधीपासून कर्ज घेतलेल्या ग्राहकांना मात्र दिलासा मिळणार आहे.
इतर बँकांची स्थिती
जुलै महिन्यात युनियन बँक ऑफ इंडिया हिनेही व्याजदर 7.35 टक्क्यांवरून 7.45 टक्क्यांपर्यंत वाढवले होते.
खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये आयसीआयसीआय बँक किमान 8 टक्के, एचडीएफसी बँक 7.90 टक्के आणि अॅक्सिस बँक 8.35 टक्के व्याजदराने गृहकर्ज देत आहेत.
आरबीआयची भूमिका
आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दरात कपात करून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र एसबीआयच्या या निर्णयामुळे घर खरेदीदारांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे. येत्या काळात इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकाही असेच पाऊल उचलतील, अशी शक्यता आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/dhule-district-year-8-years-old-chimurdivar-sexual-atrocities/