इतिहास संशोधनातील दीपस्तंभ हरपला

५० वर्षांचा ज्ञानयज्ञ थांबला

पुणे : ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि प्रख्यात लेखक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे बुधवारी (१७ सप्टेंबर) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या इतिहास संशोधन क्षेत्रातील एक महत्त्वाचा दीपस्तंभ हरपला आहे.

मेहेंदळे यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासावर विपुल संशोधन केले. ‘श्री राजा शिवछत्रपती’, ‘Shivaji: His Life & Times’, ‘शिवाजी झाला नसता तर’, ‘शिवछत्रपतींचे आरमार’ अशा महत्त्वपूर्ण ग्रंथांद्वारे त्यांनी मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा दस्तऐवजी अभ्यास पुढे नेला. ‘टिपू ॲज ही रिअली वॉज’, ‘मराठ्यांचे आरमार’ यांसारखी त्यांची संशोधनपर पुस्तके आजही संशोधकांसाठी संदर्भग्रंथ मानली जातात.

१९ डिसेंबर १९४७ रोजी जन्मलेले मेहेंदळे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनाला वाहून घेतलं. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे आणि ग. ह. खरे यांच्या परंपरेतील हे अभ्यासक फारसी, मोडी, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन अशा अनेक भाषांवर प्रभुत्व ठेवत. मूळ दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करून त्यांनी शिवचरित्राला जागतिक पातळीवर नेलं.

मेहेंदळे हे मिलिटरी सायन्सचे द्विपदवीधर होते. त्यामुळे युद्धनीती, लष्करी अभ्यास, तसेच १९७१ च्या भारत-पाक युद्धावेळी युद्ध पत्रकार म्हणून त्यांनी कामगिरी बजावली होती. निधनाच्या वेळी ते दुसऱ्या महायुद्धावर आधारित जवळपास ५ हजार पानी ग्रंथलेखनाच्या कामात गुंतलेले होते.

त्यांचं पार्थिव भारत इतिहास संशोधक मंडळ येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. दुपारी १ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतिहास संशोधन क्षेत्रासाठी ही एक अपूरणीय हानी असल्याची भावना अभ्यासक, संस्था आणि चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

read also :https://ajinkyabharat.com/remove-honar-rakhiv/