हिरडव (ता. लोणार) – २२ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे हिरडव नदीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अंतर्गत बांधण्यात
आलेल्या पुलावरील मुरूमाचा भराव पूर्णतः वाहून गेला असून पाईप उघडे पडले आहेत.
यामुळे पुलावरून वाहने नेणं धोकादायक ठरत आहे, आणि या ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या शेंदुर्जन ते मोप रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे.
याअंतर्गत अनेक ठिकाणी पूल बांधण्याचे काम सुरू असून काही पूल पूर्ण देखील झाले आहेत.
हिरडव नदीवर बांधण्यात आलेला पूल याच योजनेंतर्गत उभारण्यात आला आहे.
मात्र, या ठिकाणी नदीतील पाण्याचा प्रवाह व प्रमाण याचा योग्य अभ्यास न करता डीपीआर तयार करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
नदीला जवळपास दहा किलोमीटर अंतरावरून शेतातील मोठ्या प्रमाणात पाणी येते, याठिकाणी आधीच एक धरणही बांधलेले आहे.
तरीदेखील या नैसर्गिक प्रवाहाचा विचार न करता कमी उंचीचा आणि पाईप टाकून पूल बांधण्यात आल्याने पहिल्याच जोरदार पावसात पाण्याचा जोर सहन न करता भराव वाहून गेला.
यामुळे पुलाखाली पाणी न जाता थेट पुलाच्या वरून वाहू लागले. परिणामी, नदीचे पाणी शेतांमध्ये घुसले आणि अनेक एकरवरील पिके पूर्णतः नष्ट झाली.
पाण्याची क्षमतेचा विचार न करता बांधलेल्या या पुलामुळे गावकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली आहे.
स्थानिक शेतकरी व वाहनधारक यांची मागणी आहे की, सद्य पूल त्वरित उखडून टाकावा व त्या जागी पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन
उंच, रुंद व ओपन मोरीचा (बाजूने अडथळाविना वाहणारा) पूल उभारावा.
अन्यथा या अपयशी पुलामुळे सरकारी निधीचा अपव्यय होत असून नागरिकांचे जीव धोक्यात येण्याची शक्यता कायम राहणार आहे.