मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार – नागरिकांचा उद्रेक, तक्रारीची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा

मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार – नागरिकांचा उद्रेक, तक्रारीची चौकशी न झाल्यास उपोषणाचा इशारा

तेल्हारा (प्रतिनिधी):

तेल्हारा नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील व्यावसायिक,

युवा वर्ग व नागरिक त्रस्त झाले असून, विविध समस्यांबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

नरेंद्र गोकुलचंद सुईवाल यांनी दिनांक 18 जुलै 2025 रोजी सादर केलेल्या तक्रारीत, अतिक्रमण कारवाईत भेदभाव, सार्वजनिक मालमत्तेची निष्काळजी,

शहरातील स्वच्छता, रस्ते व बाजारपेठ व्यवस्थापनातील त्रुटी, तसेच नगरपरिषदेच्या दुकानांचा फेरलीलाव न होणे यासारख्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, 23 जानेवारी 2023 रोजी न्यायालयीन आदेश असतानाही व्यावसायिक दुकानांवर बळजबरीने कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, जिजाऊ उद्यानाजवळील 60 ते 70 वर्षे जुनी झाडे विनापरवानगी तोडण्याचा आरोप ठेकेदारांवर करण्यात आला आहे.

सादर तक्रारीसह संबंधित पुरावे व छायाचित्रे जोडून, याप्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

कार्यवाही न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला असून, काही अनुचित प्रकार घडल्यास संपूर्ण जबाबदारी शासनावर असेल, असा स्पष्ट इशाराही तक्रारीत दिला आहे.

या तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त, पालकमंत्री व नगर विकास मंत्रालय मुंबई यांनाही पाठवण्यात आली आहे.