हिरपूर येथील जिद्दी, मेहनती व कणखर युवक हर्षल गजानन सराटे याची सीमा सुरक्षा दलात (बी.एस.एफ.) निवड झाल्याने हिरपूर गावासह परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातून राष्ट्रीय सुरक्षादलात पोहोचलेल्या हर्षलच्या यशामुळे युवकांमध्ये नव्या आशेचा आणि प्रेरणेचा सूर उमटला आहे.
हर्षल सराटे यांची बी.एस.एफ.मध्ये निवड ही केवळ वैयक्तिक यश नसून हिरपूर व आजूबाजूच्या परिसरासाठी गौरवाची बाब आहे. देशसेवेची तीव्र इच्छा, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण तयारी यांच्या बळावर हर्षलने हे स्वप्न साकार केले. त्याच्या या यशामुळे गावातील युवकांना सकारात्मक दिशा मिळाली असून “ग्रामीण भागातील युवकही देशाच्या संरक्षणात मोलाची भूमिका बजावू शकतो” हा विश्वास अधिक बळावला आहे.
अजिंक्य भारतचे प्रतिनिधी दिलीप तिहिले यांनी सांगितले की, हर्षलची निवड ही हिरपूरच्या सामाजिक व शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची घटना आहे. देशसेवेची भावना जपत केलेली ही वाटचाल नव्या पिढीसाठी आदर्श ठरेल. कठीण परिस्थितीतही जिद्द न सोडता केलेले प्रयत्न यशापर्यंत पोहोचवतात, हे हर्षलने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
Related News
या यशाचे वृत्त गावात समजताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामस्थांनी फटाके फोडून, गुलाल उधळून हर्षलचे जल्लोषात स्वागत केले. कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी हर्षलवर अभिनंदनाचा वर्षाव केला. अनेकांनी “हिरपूरचा मुलगा आता देशाच्या सीमेवर उभा राहणार” या भावनेतून अभिमान व्यक्त केला.
बी.एस.एफ.सारख्या प्रतिष्ठित व कठोर शिस्तीच्या दलात निवड होण्यासाठी शारीरिक क्षमता, मानसिक ताकद आणि तीव्र स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी आवश्यक असते. हर्षलने दीर्घकाळ कठोर शारीरिक प्रशिक्षण घेतले. धावणे, व्यायाम, मैदानी सराव यासोबतच लेखी परीक्षा आणि मानसिक कसोटीची तयारी त्याने सातत्याने केली. ग्रामीण भागातील मर्यादा, सुविधा अभाव आणि आर्थिक अडचणी असूनही आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर त्याने प्रत्येक अडथळा पार केला.
हर्षलच्या यशातून युवकांसाठी महत्त्वाचा संदेश पुढे आला आहे. मोबाईलचा अतिवापर, व्यसनाधीनता आणि नकारात्मक सवयींपासून दूर राहून शारीरिक तंदुरुस्ती, अभ्यास, शिस्त आणि सकारात्मक विचारांची कास धरली तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही, हे त्याच्या प्रवासातून स्पष्ट होते. देशसेवा ही केवळ नोकरी नसून राष्ट्रप्रेमाची सर्वोच्च अभिव्यक्ती आहे, असे मत यावेळी अनेकांनी व्यक्त केले.
हर्षल गजानन सराटे यास बी.एस.एफ.मध्ये निवडीबद्दल सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. पुढील देशसेवेच्या आव्हानात्मक, शिस्तबद्ध आणि गौरवशाली वाटचालीसाठी त्यास मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत. हिरपूरचा हा कणखर युवक आता देशाच्या सीमेवर उभा राहून राष्ट्ररक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडेल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
