हमासच्या अड्ड्यांवर आंतरराष्ट्रीय राजकारणाची सरगर्मी

अड्ड्यांवर

इस्राईलने कतारवर केलेल्या हल्ल्यानंतर हमासच्या जागतिक नेटवर्कवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. गाझापट्टीत हमासची मुळे असली तरी त्याची राजकीय कार्यालये आणि नेतृत्व अनेक देशांत विखुरलेले आहे. त्यामुळे इस्राईलचे पुढचे टार्गेट कोणता देश असणार, हा प्रश्न सध्या मध्यपूर्वेतील घडामोडींमध्ये केंद्रस्थानी आला आहे.

कतारनंतर कुठे आहे हमासचे बालेकिल्ले?

हमासचे राजकीय ब्युरो २०१२ पासून दोहामध्ये सक्रीय आहे. याआधी हे कार्यालय सिरियात होते. परंतु गृहयुद्धानंतर तेथे टिकणे अवघड झाल्याने कतारने हमासच्या वरिष्ठ नेत्यांना आश्रय दिला. खलील अल-हय्या आणि खालिद मशाल यांसारखे हमासचे महत्त्वाचे नेते कतारमध्ये असल्याचे मानले जाते.कतारनंतर तुर्की हे हमासच्या पुढील राजकीय हालचालींचे मोठे केंद्र आहे. इस्तंबूल आणि अंकारा येथे २०११ पासून हमासची कार्यालये कार्यरत आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, इस्राईलचा पुढचा दबाव इथे वाढू शकतो.त्याचबरोबर लेबनॉन, इराण आणि इराक हे देशही हमासच्या नेटवर्कसाठी महत्त्वाचे मानले जातात. येथे हमासला हिजबुल्लाहसारख्या इराण समर्थित संघटनांचा पाठींबा आहे. त्यामुळे या देशांत इस्राईलचे गुप्त ऑपरेशन्स वाढतील, अशी शक्यता आहे.

फंडिंग नेटवर्कचे रहस्य

हमासचे फंडिंग नेटवर्क केवळ मध्यपूर्वेतच नाही तर आफ्रिका व युरोपमधील देशांतही पसरलेले आहे. अल्जेरिया, सूदान, यमन, सौदी अरब या देशांत हमासशी संलग्न कॅडर सक्रिय आहेत. अधिकृत कार्यालय नसले तरी या देशांतून आर्थिक मदत व साधनसंपत्ती मिळत असल्याचे वृत्त आहे.अलिकडच्या वर्षांत इस्राईलच्या टार्गेट किलिंग ऑपरेशन्समुळे हमासचे बडे नेते गुप्त ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. तरीही त्यांचे संपर्क व निर्णयप्रक्रिया कायम सुरू असल्याचे दिसते.

युद्धविरामावर प्रश्नचिन्ह

कतारवरील हल्ल्याला अनेक देशांनी ‘स्टेट टेरर’ म्हटले आहे. याआधीही इस्राईलने इराणमध्ये हमासचे वरिष्ठ नेते इस्माईल हानिया यांची हत्या केली होती. त्या वेळी युद्धविराम चर्चेवर परिणाम झाला होता. यावेळेसही कतारवरील हल्ल्याचा उद्देश संभाव्य युद्धविरामाला धक्का देणे असल्याचा आरोप होत आहे.

निष्कर्ष

कतारनंतर तुर्की, इराण किंवा लेबनॉनमध्ये इस्राईलचे पुढचे ऑपरेशन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हमासचे जाळे केवळ गाझापुरते मर्यादित नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेले असल्याने, या संघर्षाचा आवाका मध्यपूर्वेच्या सीमा ओलांडून जागतिक पातळीवर पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.