अकोटमध्ये ९ व १० फेब्रुवारीला भव्य ग्रंथोत्सव; पालकमंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

ग्रंथोत्सव

अकोटमध्ये ९ व १० फेब्रुवारीला भव्य ग्रंथोत्सव; पालकमंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती

अकोट : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने अकोट येथे प्रथमच तालुका स्तरावर भव्य ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणांतर्गत होणारा हा ग्रंथोत्सव ९ व १० फेब्रुवारी रोजी गांधी मैदानाजवळील सांस्कृतिक कला भवन येथे पार पडणार असून या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी १० वाजता ग्रंथ पूजन आणि ग्रंथ दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात होईल. या ग्रंथदिंडीचे उद्घाटन अकोट नगर परिषदेच्या नगराध्यक्ष माया धुळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नगरपरिषद ग्रंथालयापासून सांस्कृतिक कला भवनापर्यंत निघणाऱ्या या दिंडीत विद्यार्थी, वाचनप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या प्रसंगी साहित्यिक नरेंद्र इंगळे, माजी सभापती दादासाहेब खोटो, अमरावती विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रभाकरराव घुगे तसेच नवयुग वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. मोहन आसलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

Related News

दुपारच्या सत्रात ग्रंथोत्सवाचे औपचारिक उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्यासाठी आमदार रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकडे, अमोल मिटकरी, किरण सरनाईक, वसंत खंडेलवाल, धीरज लिंगाडे, हरीश पिंपळे, नितीन देशमुख, साजिद खान पठाण तसेच खासदार अनुप संजय धोत्रे यांची उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय नगराध्यक्ष माया धुळेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

विशेष उपस्थितीत जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मनपा आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर, मुख्याधिकारी शशिकांत बाबर, अमरावती विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहूरवाघ तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारी सदस्य सुरेश खोटरे उपस्थित राहतील. ज्येष्ठ साहित्यिका प्रतिमा इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

ग्रंथोत्सवात विविध सांस्कृतिक व बौद्धिक कार्यक्रमांचीही मेजवानी असणार आहे. दुपारच्या सत्रात “मला जिजाऊ व्हायचं” हा एकपात्री नाट्यप्रयोग हर्षदा इंदाने सादर करणार असून हा प्रयोग महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारा ठरणार आहे. तिसऱ्या सत्रात “मराठी भाषेपुढील आव्हाने” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. साहित्यिक पुष्पराज गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या चर्चासत्रात प्रा. प्रकाश गायकी, प्रा. मिलिंद खोटरे आणि संजय आठवले सहभागी होऊन मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मार्गदर्शन करतील.

चौथ्या सत्रात “सोशल मीडिया आणि वाचन” या समकालीन विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. श्री शिवाजी महाविद्यालय, अकोला येथील प्रा. रावसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली अनुराग मिश्रा, नरेंद्र इंगळे आणि प्रा. मोहन काळे यांचा सहभाग राहणार आहे. डिजिटल युगात वाचनाची सवय कशी टिकवावी आणि वाढवावी यावर या चर्चेत विशेष भर दिला जाणार आहे.

तालुका स्तरावर प्रथमच होत असलेला हा ग्रंथोत्सव अकोटसाठी सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील वाचनप्रेमींना एकत्र आणत ज्ञान, साहित्य आणि संस्कृतीचा उत्सव साजरा करण्याची ही मोठी संधी आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/stay-at-the-headquarters-otherwise-action-will-be-taken-as-directed-by-the-district-health-officers-phc-doctor/

Related News