धक्कादायक! 6 हजार पगाराच्या इंजिनिअरकडे 5 बंगले, 14 प्लॉट आणि 2 कोटींची रोकड; छाप्यात उघड झाले कोट्यवधींचे साम्राज्य
बैकुंठनाथ बेहरा संपत्ती प्रकरण : ओडिशा राज्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. अवघा 6 हजार रुपये मासिक पगार घेणाऱ्या एका सरकारी अभियंत्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. दक्षता विभागाने (Vigilance Department) केलेल्या धाडीत या अभियंत्याकडे तब्बल 5 बंगले, 14 भूखंड, 2 कोटींपेक्षा अधिकची रोकड, 300 ग्रॅमहून अधिक सोने आणि विविध ठेवी असल्याचे उघड झाले आहे.
या कारवाईनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील अभियंता म्हणजे बैकुंठनाथ बेहरा. तो कंधमाळ जिल्ह्यातील बालीगुडा येथे एकीकृत आदिवासी विकास संस्था (ITDA) मध्ये सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे.
तक्रारींनंतर झाली मोठी कारवाई
गेल्या काही महिन्यांपासून बैकुंठनाथ बेहरा याच्याकडे उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या अनेक तक्रारी दक्षता विभागाकडे दाखल होत होत्या. या तक्रारींची प्राथमिक चौकशी केल्यानंतर भुवनेश्वर येथील विशेष न्यायालयाची परवानगी घेण्यात आली. त्यानंतर दक्षता विभागाने एकाच वेळी नऊ ठिकाणी छापेमारीची मोठी मोहीम राबवली.
Related News
या कारवाईत दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पाच उपअधीक्षक, सहा निरीक्षक आणि अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश होता. भुवनेश्वर, बारीपदा, जाजपूर जिल्ह्यातील धर्मशाळा आणि बालीगुडा परिसरात ही कारवाई करण्यात आली.
5 बंगले आणि 14 प्लॉटचा खुलासा
छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना बैकुंठनाथ बेहरा याच्या नावावर आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचे आढळून आले. भुवनेश्वरच्या चंद्रशेखरपूर भागातील नीलाद्री विहार येथे चार मजली आलिशान इमारत, शैलाश्री विहार येथे तीन मजली इमारत आणि कानन विहार फेज-1 येथे दोन मजली घर असल्याचे समोर आले.
याशिवाय जाजपूर जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी दोन मजली घर आढळले. तपासादरम्यान एकूण 5 बंगले आणि 14 भूखंड असल्याची माहिती पुढे आली. यातील सात भूखंड भुवनेश्वरमधील मोक्याच्या ठिकाणी असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित भूखंड जाजपूर, बारीपदा आणि इतर भागांत असल्याचे तपासात स्पष्ट झाले.
नोटा मोजताना मशीन जॅम
या छाप्यादरम्यान सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली ती जप्त करण्यात आलेली रोकड. अधिकाऱ्यांनी घर आणि बँक लॉकरमधून तब्बल 2 कोटी रुपयांहून अधिक रक्कम जप्त केली. सुरुवातीला घरातून 2.66 लाख रुपये रोख सापडले. त्यानंतर विविध बँक लॉकर उघडण्यात आले असता मोठ्या प्रमाणावर रोकड समोर आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा मोजताना मशीनवर ताण आला आणि काही काळ मशीन बंद पडल्याची चर्चा आहे. त्यामुळे या कारवाईची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सोने, ठेवी आणि बँक खात्यांची चौकशी
रोकड व्यतिरिक्त अधिकाऱ्यांना 300 ग्रॅमहून अधिक सोने आणि इतर मौल्यवान दागिने सापडले. तसेच विविध बँक खात्यांमधील ठेवी, पोस्ट ऑफिस बचत योजना, मुदत ठेवी (FD) आणि इतर आर्थिक गुंतवणुकींचीही माहिती हाती आली आहे.
दक्षता विभाग सध्या सर्व कागदपत्रांची छाननी करत असून मालमत्तेचा नेमका आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही मालमत्ता नातेवाईकांच्या नावावर असल्याचा संशय असल्याने तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनाही बसला धक्का
छापेमारीदरम्यान समोर आलेल्या संपत्तीच्या आकड्याने कारवाई करणारे अधिकारीदेखील चक्रावले. सरकारी सेवेत असलेल्या एका अभियंत्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कशी जमा झाली, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
विशेष म्हणजे, त्याच्या घोषित उत्पन्नाच्या तुलनेत ही संपत्ती अनेक पटींनी अधिक असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. त्यामुळे ही मालमत्ता नेमकी कोणत्या स्रोतांमधून उभी राहिली, याचा शोध घेण्यासाठी आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मदत करणाऱ्यांचाही शोध
बैकुंठनाथ बेहरा प्रकरणात आता तपास यंत्रणांनी चौकशीची व्याप्ती आणखी वाढवली आहे. बैकुंठनाथ बेहरा याने इतक्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता कशी उभी केली, याचा सखोल तपास सुरू असून त्याला कोणाची मदत मिळाली का, याचाही शोध घेतला जात आहे. बैकुंठनाथ बेहरा याच्या बँक खात्यांतील व्यवहार, मालमत्ता खरेदीची कागदपत्रे आणि आर्थिक देवाणघेवाणीची माहिती तपासली जात आहे. तसेच बैकुंठनाथ बेहरा याच्यासोबत इतर अधिकारी, कर्मचारी किंवा मध्यस्थांचा सहभाग होता का, याचीही चौकशी सुरू आहे. तपासातून आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे ओडिशामधील सरकारी यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दक्षता विभागाच्या या मोठ्या कारवाईनंतर आणखी काही धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- बैकुंठनाथ बेहरा संपत्ती प्रकरण
