इराणवर जागतिक दबाव वाढला ! 25 शक्तिशाली देश एकत्र ; होर्मुज संकटामुळे जगात खळबळ

इराणवर

मध्यपूर्वेत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराण विरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा दबाव तयार झाला आहे. जगातील 25 हून अधिक शक्तिशाली देशांनी एकत्र येत इराणच्या कारवायांविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. या घडामोडींमुळे जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरात यांसारख्या देशांनी संयुक्त निवेदन जारी करत इराणच्या वाढत्या आक्रमक भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे. या निवेदनात इराणकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांना जागतिक शांततेसाठी गंभीर धोका असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

होर्मुज सामुद्रधुनीत तणाव शिगेला

होर्मुज सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. या मार्गातून दररोज जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल वाहतूक होते. त्यामुळे येथे निर्माण झालेला तणाव संपूर्ण जगावर परिणाम करणारा ठरतो.

Related News

इराणवर आरोप आहे की त्यांनी या सामुद्रधुनीत माईन्स टाकणे, व्यापारी जहाजांवर ड्रोन हल्ले करणे आणि तेल पाइपलाईन्सना लक्ष्य करणे अशा आक्रमक हालचाली केल्या आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेचे उल्लंघन झाल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धोका

इराण-अमेरिका तणावाचा परिणाम थेट जागतिक व्यापारावर होत आहे. तेल पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अनेक देशांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. परिणामी, इंधन दर वाढत असून महागाईचा दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विशेषतः विकसनशील आणि गरीब देशांवर याचा सर्वाधिक परिणाम होणार असल्याचे या संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कारण ऊर्जा दरवाढीचा थेट परिणाम अन्न, वाहतूक आणि उद्योगांवर होतो.

संयुक्त राष्ट्रांकडून गंभीर दखल

या प्रकरणाची दखल संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद यांनी घेतली आहे. अनेक देशांनी इराणच्या कारवायांना “आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन” असे संबोधले आहे. सागरी मार्गांची सुरक्षितता आणि मुक्त वाहतूक हा सर्व देशांचा मूलभूत अधिकार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू

या संकटाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था (IEA) ने मोठे पाऊल उचलले आहे. त्यांनी आपले आपत्कालीन तेल साठे बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.तसेच 25 देशांच्या गटाने इतर तेल उत्पादक राष्ट्रांसोबत समन्वय साधत उत्पादन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

इराणसमोर वाढती कोंडी

आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक निर्बंध आणि लष्करी तणाव या सर्वांचा एकत्रित परिणाम इराणवर होत आहे. जर हा तणाव आणखी वाढला, तर मोठ्या प्रमाणावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

विशेषतः होर्मुज सामुद्रधुनीत कोणतीही मोठी कारवाई झाल्यास जागतिक तेल पुरवठा ठप्प होऊ शकतो, ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल.सध्याच्या घडामोडींमुळे इराण आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. 25 शक्तिशाली देशांनी एकत्र येऊन घेतलेली भूमिका ही केवळ राजनैतिक इशारा नसून भविष्यातील कठोर कारवाईची नांदी मानली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

read also :  https://ajinkyabharat.com/cab-scam-285-rupees-ride-6000-rupees-bill-shocking-type-in-bengaluru-scary-atmosphere-among-passengers/

Related News