गाझा – इस्रायल-हमास संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून आता या युद्धात सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर बळी पडत आहेत. गाझा पट्ट्यातील
नासेर हॉस्पिटलवर इस्रायलने ड्रोनद्वारे हल्ला केला.
या भीषण हल्ल्यात ३ पत्रकारांसह १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पॅलेस्टाईन आरोग्य खात्याने दिली आहे.
दुहेरी हल्ला : बचाव पथकावरही बॉम्बवर्षाव
प्रत्यक्षदर्शींनुसार, पहिल्या हल्ल्यानंतर पत्रकार, स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले.
त्याचवेळी इस्रायली हवाईदलाने दुसरा हल्ला चढवला.
या दुहेरी हल्ल्यात अल-जझीराचे मोहम्मद सलामा, रायटर्सचे कॅमेरामन हुसाम अल-मस्री आणि
एनबीसीचे पत्रकार मुआझ अबू ताहा ठार झाले.
याशिवाय फ्रीलान्स पत्रकार मरियम अबू दक्का व एका बचाव कर्मचाऱ्याचाही मृत्यू झाला.
रायटर्सच्या माहितीनुसार, हुसाम अल-मस्री यांचा लाईव्ह कॅमेरा फीड पहिल्याच क्षणी बंद पडला.
या हल्ल्यावर इस्रायली सैन्य किंवा पंतप्रधान कार्यालयाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
गाझामध्ये उपासमारीचे संकट
इस्रायलच्या सततच्या बॉम्बहल्ल्यांमुळे व कडक नाकेबंदीमुळे गाझा पट्ट्यात अन्नधान्य, औषधे व इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, हजारो नागरिक आतापर्यंत मृत्यूमुखी पडले असून त्यात महिला आणि लहान मुलांचा मोठा समावेश आहे.
रुग्णालये उद्ध्वस्त झाल्याने आरोग्यसेवा कोलमडली आहे, तर मुलांना उपासमारी व कुपोषणाचा मोठा फटका बसत आहे.
आंतरराष्ट्रीय समुदाय युद्धविरामाची मागणी करत असला तरी परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे.
