गावंडगावात तरुणाची आत्महत्या; पोलिसांचे दारूविक्रेत्यांकडे दुर्लक्ष ?
पातूर (अकोला) – पातूर तालुक्यातील गावंडगाव येथे २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन
आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून, गावकऱ्यांनी या घटनेला थेट गावातील अवैध दारू विक्री जबाबदार धरली आहे.
पोलिसांच्या छत्रछायेखालीच हा धंदा सुरू असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
रुपेश ज्ञानदेव राठोड (२१) या तरुणाने गावाच्या शेवटी असलेल्या घराजवळ लिंबाच्या झाडाला साडीच्या दोऱ्याने गळफास घेतला.
गावकऱ्यांच्या मते, हा प्रकार दारूच्या नशेत घडला असून, गावात सहजपणे दारू उपलब्ध होते.
तक्रार करणाऱ्यांची नावे दारू विक्रेत्यांना सांगून त्यांना धमक्या व शिवीगाळ केली जाते, असेही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि ग्रामस्थांनी वारंवार पोलिसांकडे अवैध दारू विक्रीबाबत तक्रार केली.
मात्र, पोलिसांनी ठोस कारवाई न करता दुर्लक्ष केल्यामुळेच हा धंदा फोफावल्याचा आरोप करण्यात येत आहे.
दरम्यान, पोलिसांनी मात्र आत्महत्या कर्जबाजारीपणा आणि नैराश्यातून झाल्याचे सांगत, अवैध दारूविरुद्ध वेळोवेळी कारवाई होत असल्याचा दावा केला आहे.
पण प्रत्यक्षात गावातील दारू विक्री सुरूच असल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
गावकऱ्यांचा इशारा आहे की, अवैध दारू विक्री तातडीने बंद झाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल.
Read also https://ajinkyabharat.com/dainik-almanac-and-rashyvishya-monday-11-august-2025/