गावकऱ्यांचा वनविभागाविरोधात संताप

गाढ झोपेत असलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला

गोंदिया : जिल्ह्यात मानवी जीवितहानी करणाऱ्या प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. नुकत्याच पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच, देवरी तालुक्यातील धमदिटोला गावात वाघाच्या हल्ल्याने एक महिला ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.धमदिटोला येथे आपल्या मुलीकडे आलेल्या प्रभाबाई कोराम (४९) या महिला शनिवारी रात्री घराच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. मध्यरात्री दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करत त्यांचा मृत्यू घडवला. हल्ल्यानंतर वाघाने मृत महिलेला ब्लँकेट आणि मच्छरदाणीसह फरफटत नेले.

गावकऱ्यांचा आक्रोश – आर्थिक मदतीची मागणी

रविवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मृतक कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी वनविभागाकडून तत्काळ १ लाख रुपयांची मदत करण्यात आली असून पुढील आठवडाभरात संपूर्ण मदत दिली जाईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.

तीन दिवसांत दोन हल्ले

फक्त तीन दिवसांपूर्वीच मोरगाव अर्जुनी तालुक्यातील संजयनगर येथे पाच वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतला होता. त्यानंतर लगेचच वाघाच्या हल्ल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नाशिकमध्येही बिबट्याचा बळी

याचदरम्यान नाशिकच्या वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटजवळ दोन वर्षीय श्रुतिक गंगाधर या चिमुकल्यावर बिबट्याने झडप घालून जंगलात ओढून नेले. आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी व वनविभागाने श्वानपथक, थर्मल ड्रोनच्या मदतीने शोधमोहीम राबवली. मात्र दोन दिवसांनंतर जंगलात श्रुतिकचा मृतदेह सापडला. श्रुतिकचे वडील गंगाधर हे लष्करी जवान असून, एकुलत्या मुलाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/capten-suryacha-finally-clear-negative/