गरीबाचा ‘काजू’ ठरलेला शेंगदाणा महाग; महाशिवरात्रीपूर्वी दरात विक्रमी वाढ
महाशिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना उपवासासाठी अत्यावश्यक मानल्या जाणाऱ्या शेंगदाण्याच्या दरात यंदा मोठी वाढ झाली आहे. एकेकाळी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा शेंगदाणा ‘गरीबाचा काजू’ म्हणून ओळखला जात असला, तरी सध्या त्यानेही महागाईचा उच्चांक गाठल्याने उपवास करणाऱ्यांचे बजेट बिघडले आहे.
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत भगर, राजगिरा, साबुदाणा यांसारख्या फराळाच्या साहित्याला मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेंगदाण्याचे दरही वाढले असून घाऊक बाजारातील दरवाढीचा परिणाम थेट चिल्लर बाजारावर झाला आहे. सध्या किरकोळ बाजारात शेंगदाणा प्रतिकिलो १६० ते १८० रुपयांदरम्यान विकला जात असल्याचे दिसून येत आहे. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.
Related News
महाशिवरात्री 2026 : शिवलिंग पूजन आणि उपवासाचे फायदे जाणून घ्या
उपवासातील अनेक पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. शेंगदाण्याची चटणी, साबुदाणा खिचडी, वडे तसेच लाडू यांसाठी त्याची गरज भासते. त्यामुळे दरवाढीचा थेट परिणाम घरगुती खर्चावर होत असून “उपवास करायचा की खर्च सांभाळायचा?” असा प्रश्न अनेक गृहिणींना पडला आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, यंदा देशातील काही भागांत प्रतिकूल हवामानामुळे शेंगदाण्याचे उत्पादन घटले आहे. उत्पादन कमी असताना निर्यात वाढल्याने स्थानिक बाजारातील उपलब्धता मर्यादित झाली आहे. नवीन मालाची आवक अपेक्षेइतकी नसल्याने दरात सातत्याने वाढ होत आहे.
हिरपूर येथील दुकानदार मयूर तिहिले म्हणाले, “यंदा शेंगदाण्याची आवक कमी असल्याने घाऊक दरच वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही १६० ते १८० रुपये किलो दराने विक्री करावी लागत आहे. मागणी आहे, मात्र वाढलेल्या दरामुळे ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करत आहेत.”
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहक आता तुलनेने स्वस्त पर्यायांकडे वळताना दिसत आहेत. केळी, रताळी, बटाटे तसेच घरगुती चिप्स यांना पसंती मिळत असून महागाईमुळे घरगुती फराळाला प्राधान्य दिले जात आहे.
महाशिवरात्रीसारख्या धार्मिक सणाच्या तोंडावर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. ‘गरीबाचा काजू’ म्हणून ओळखला जाणारा शेंगदाणा आता खरोखरच महाग झाला असल्याची भावना ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.
