खामगाव/प्रतिनिधी :जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूमधडाक्यात सुरुवात झाली असून
सकाळपासूनच ढोल-ताशांचा गजर, लेझीमच्या तालावर नृत्य आणि “गणपती बाप्पा मोरया”
च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले.
घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून
शहर, गाव आणि गल्लीबोळात उत्साहाचे चैतन्यमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
भव्य सजावट, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे संदेश, सामाजिक उपक्रम
आणि थीम्समुळे सार्वजनिक मंडळांची प्रतिष्ठापना यंदा विशेष आकर्षण ठरत आहे.
काही मंडळांनी महिला शक्ती, जलसंवर्धन व वृक्षारोपण यासारख्या
सामाजिक संदेशांवर आधारित थीम मांडल्या आहेत.
घरोघरी गणपती स्थापनेसह पूजा, आरती व नैवेद्याचा गजर सुरू झाला आहे.
लहान मुलांनी फुलांच्या सजावटी आणि मखरनिर्मितीत सहभाग घेतल्याने उत्सव अधिक रंगतदार झाला आहे.
शहरातील बाजारपेठा, रस्ते आणि चौक दिव्यांच्या रोषणाईने उजळले असून
गणेशमूर्ती आणण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसली.
काही मंडळांनी वाजतगाजत मिरवणुकीने, तर काहींनी पारंपरिक पद्धतीने गणेशाचे स्वागत केले.
दरम्यान, पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांकडून शिस्त व सुरक्षेवर विशेष लक्ष दिले जात असून
नागरिकांनी शांततेत आणि भक्तिभावाने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एकूणच जिल्हाभरात भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची मंगलमय सुरुवात झाली आहे.