गायगावचा नवसाला पावणारा गणपती – अकोलामधील जवळील भक्तांची श्रद्धास्थळ
अकोला : अकोला जिल्ह्यातील निमकर्दा जवळ असलेला गायगाव गणपती, “इच्छापूर्ती” आणि “नवसाला पावणारा” म्हणून जिल्हाभर प्रसिद्ध आहे. अकोल्यापासून अवघ्या १७ किलोमीटर अंतरावर असलेल्या या गणपतीच्या दर्शनासाठी जिल्ह्यातील तसेच विदर्भभरातून भाविक वर्षभर मोठ्या संख्येने येतात. अनेक जण तर पायी वारी करूनच नवस फेडतात.
शेंदुराची मनमोहक मूर्ती, डोक्यावर चांदीचा मुकुट, आणि शांत, पवित्र वातावरण – अशी या स्वयंभू गणपतीची ओळख आहे. सुमारे २०० वर्षांपूर्वी अग्रवाल कुटुंबीयांनी आपल्या मालकीच्या शेतात या गणपतीची स्थापना केली होती. सुरुवातीला केवळ तीन बाय तीन फुटांचे छोटे देऊळ होते, पण हळूहळू गणपतीची ख्याती पसरत गेली. तीस वर्षांपूर्वी रस्त्याचे बांधकाम झाल्यानंतर येथे भाविकांची संख्या आणखी वाढली आणि नंतर भव्य मंदिर उभारण्यात आले.
वर्षभर या मंदिराची देखरेख अग्रवाल कुटुंबीय करतात. सकाळ-संध्याकाळ गणपतीची आरती केली जाते. विशेष म्हणजे, श्रावण महिन्याच्या पहिल्या चतुर्थीला येथे भाविकांची मोठी पायी वारी निघते. विदर्भाची पंढरी मानल्या जाणाऱ्या शेगावच्या मार्गावर असलेल्या या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय अनेक भाविक पुढे जात नाहीत.
भाविकांच्या मते, या गणपतीच्या कृपेने त्यांचे नवस पूर्ण होतात आणि अनेकांनी चमत्कारांचा अनुभव घेतल्याचे सांगितले आहे. गणेशोत्सव काळात येथे महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यामुळेच अकोल्याचा “मानाचा गणपती” म्हणून गायगाव गणपतीची ओळख अधिक दृढ झाली आहे.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/akot-fala-polys-station-haddit-illegal-antidote-action/
