@ दारव्हा रस्त्यावरील भीषण अपघात
@ बोलेरो चालक अपघातानंतर पसार
कारंजा (प्रतिनिधी) –
दारव्हा रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो पिकअपने दोन दुचाकींना जोरदार धडक दिल्याने दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला,
तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना रविवार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या पावर हाऊसजवळ घडली.
या भीषण अपघातात सुभाष किसन चव्हाण ५५ वर्ष रा.शिक्षक कॉलनी, कारंजा आणि नाना जयसिंगपूरे ५६ वर्ष, रा.खरडगाव ता. नेर, ह.मु. यशवंत कॉलनी,
कारंजा यांचा मृत्यू झाला आहे. तर जया नाना जयसिंगपूरे वय ५० आणि प्रभू माणिक
राठोड वय ४८ रा .कामठवाडा ता. कारंजा हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातावेळी नाना जयसिंगपूरे हे पत्नी जया यांच्यासह तेरवीच्या कार्यक्रमासाठी लोही ता. नेर येथे जात होते.
ते एमएच ३७ डी ६८१७ क्रमांकाच्या दुचाकीवर होते. दुसरीकडे, सुभाष चव्हाण हे प्रभू राठोड यांच्या समवेत शेतकाम
आटोपून एमएच ३७ एबी ५२१२ क्रमांकाच्या दुचाकीने कारंजाच्या दिशेने येत होते.
दरम्यान, भरधाव वेगातील बोलेरो पिकअप (एमएच २९ बी ७६८) ने दोन्ही दुचाकींना जबर धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णसेवक रमेश देशमुख, शंकर रामटेके व शुभम खोंड यांनी घटनास्थळी धाव घेऊन
अपघातग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून सुभाष चव्हाण आणि नाना जयसिंगपूरेंना मृत घोषित केले.
जखमींपैकी प्रभू राठोड यांना पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले असून,
जया जयसिंगपुरे यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर बोलेरो चालकाने वाहन जागीच टाकून पलायन केले असून, कारंजा शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मृतांची सामाजिक बांधिलकी
सुभाष चव्हाण हे मूळचे रामगाव रामेश्वर (ता. दारव्हा) येथील असून ते जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पत्नी विजया चव्हाण ग्रामसेविका आहेत.
तर नाना जयसिंगपूरे हे मुरंबी (ता. कारंजा) येथील पशुसंवर्धन विभागात कार्यरत होते.
–कुटुंबीयांचा आक्रोश आणि शोककळा
उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला. परिसरात शोककळा पसरली होती.
मृतकांच्या घरच्यांसह आप्तस्वकीयांनी रुग्णालयात गर्दी केली होती.
घटनेमुळे संपूर्ण कारंजा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/union-minister-nitin-gadkarichaya-gharla-bombne-udwoon-danyachi-threat/