अत्यावश्यक औषधे, ईव्ही बॅटरी, स्मार्टफोन आणि सोलर पॅनेल स्वस्त होणार आहेत; तर लक्झरी घड्याळे, खतं आणि ‘सिन गुड्स’ (तंबाखूजन्य उत्पादने इ.) महागण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ला चालना देण्यासाठी अनेक घोषणा केल्या. या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळण्याबरोबरच ग्राहक आणि सामान्य करदात्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या अर्थसंकल्पातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे करसवलतीमुळे काही वस्तू स्वस्त होणार आहेत, तर काही आयात वस्तूंवरील सूट रद्द किंवा शुल्क वाढवल्यामुळे त्या महागणार आहेत. सरकारने अत्यावश्यक औषधे, इलेक्ट्रिक वाहने आणि लेदर उत्पादनांसह अनेक वस्तूंवरील टॅरिफ आणि कस्टम ड्युटी कमी केली आहे. दुसरीकडे, घड्याळे आणि मद्य यांसारख्या लक्झरी वस्तूंवर अधिक कर आकारला जाणार असल्याने त्या महागतील.
स्वस्त होणाऱ्या वस्तूंची यादी
केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये विमानांचे सुटे भाग, मायक्रोवेव्हचे घटक, अत्यावश्यक औषधे आणि काही आयात वस्तूंवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे मायक्रोवेव्ह ओव्हन, ईव्ही बॅटरी, सोलर पॅनेल आणि विमानांचे सुटे भाग स्वस्त होणार आहेत.
Related News
मधुमेह आणि कर्करोग रुग्णांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांसह एकूण 17 औषधेही स्वस्त होणार आहेत.
याशिवाय, भारतात तयार होणारे स्मार्टफोन आणि टॅबलेटही स्वस्त होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक वापरासाठी आयात केल्या जाणाऱ्या काही वस्तूंच्या किमतीतही शुल्क कपातीमुळे घट होईल.
लेदर निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी काही विशिष्ट कच्च्या मालाच्या ड्युटी-फ्री आयातीचा प्रस्तावही सीतारामन यांनी मांडला. अमेरिकेने लावलेल्या 50 टक्के शुल्काचा फटका बसलेल्या लेदर निर्यातदारांना यामुळे दिलासा मिळेल.
महाग होणाऱ्या वस्तू
लक्झरी घड्याळे आणि आयात मद्य या वस्तू महागणार आहेत. तसेच सिगारेट, बीडी, पान मसाला आणि गुटखा यांसारखी ‘सिन गुड्स’ही महाग होणार आहेत.
कॉफी रोस्टिंग, ब्रूइंग आणि व्हेंडिंग मशीनवरील सूट सरकारने रद्द केल्यामुळे ही उपकरणे अधिक महाग होण्याची शक्यता आहे.
अमोनियम फॉस्फेट किंवा अमोनियम नायट्रो-फॉस्फेट यांच्या आयातीवरील शुल्कसवलत हटवण्यात आल्याने काही खतांच्या किमती वाढू शकतात.
तसेच आयात केलेली टीव्ही उपकरणे, कॅमेरे, चित्रिकरणासाठी वापरली जाणारी साधने आणि ध्वनी रेकॉर्डिंग उपकरणेही महाग होण्याची शक्यता आहे.
