युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला

हजारो प्रवासी अडचणीत,उड्डाणे रद्द

युरोपमधील प्रमुख विमानतळांवर शनिवारी मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ला झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यामुळे विमानसेवा विस्कळीत झाली आहे. लंडनच्या हीथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह अनेक विमानतळांवर चेक-इन व बोर्डिंग प्रणाली ठप्प झाली आहे. परिणामी हजारो प्रवासी अडकले असून अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

१० उड्डाणे रद्द, डझनभर उशिरा

ब्रुसेल्स विमानतळाने सांगितले की, १० उड्डाणे रद्द करण्यात आली असून, १७ हून अधिक विमानांना तासभराचा उशीर होऊ शकतो. या तांत्रिक समस्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र प्राथमिक तपासात सायबर हल्ल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विमानतळांवर प्रवाशांची गर्दी

सेवा ठप्प झाल्यामुळे विमानतळांवर चेक-इनसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ठिकठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सतत विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बर्लिन विमानतळाची माहिती

बर्लिन विमानतळाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, संगणक प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे चेक-इनसाठी जास्त वेळ लागत आहे. “या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे तेथे प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटले आहे.

युरोपभर धास्ती

अचानक झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे हजारो प्रवासी विस्कळीत झाले आहेत. उड्डाणे उशिरा होत असल्याने किंवा रद्द झाल्याने अनेकांच्या प्रवासाच्या योजनाही बिघडल्या आहेत. युरोपातील विमानतळांवर मोठा सायबर हल्ला झाला का? याबाबत प्रशासन मात्र सध्या मौन बाळगत आहे.युरोपातील प्रमुख विमानतळांवरच्या या घटनेमुळे सायबर सुरक्षेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

read also : https://ajinkyabharat.com/silver-patidarsarakhi-lapse/