डॉ. गोपाल बछिरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

लोणार नगरपरिषदेत दूषित पाणीपुरवठा

लोणार (बुलढाणा): लोणार शहरातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी श्रीमती विभा वऱ्हाडे, पाणीपुरवठा अधिकारी आणि आरोग्यसेवा अधिकारी यांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

लोणार शहरात गेल्या काही महिन्यांपासून पिवळसर, दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी नळयोजनेतून नागरिकांना पुरवले जात असल्याचे डॉ. बछिरे यांचे म्हणणे आहे.

हे पाणी कोणत्याही प्रकारच्या फिल्टरशिवाय धरणातून थेट पाण्याच्या टाकीत सोडले जाते.

इतकेच नाही तर महिना-दोन महिन्यातून एकदाच पाणी सोडले जाते.

प्रयोगशाळेचा अहवाल

जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, बुलढाणा येथील प्रमुख अनुजीव शास्त्रज्ञांनी घेतलेल्या नमुन्यांनुसार हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे सातत्याने निष्पन्न झाले आहे.

१२ डिसेंबर २०२३, ८ फेब्रुवारी २०२४, १८ सप्टेंबर २०२४, ४ सप्टेंबर २०२४, ४ मार्च २०२५ आणि १७ एप्रिल २०२५ रोजी तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये हेच स्पष्ट झाले आहे.

डॉ. बछिरे यांची कारवाईची मागणी

नागरिकांना दूषित पाणी देणे म्हणजे संविधानातील कलम २१ (जीवनाचा अधिकार) चे उल्लंघन असल्याचे डॉ. बछिरे यांनी ठासून सांगितले.

तसेच, BNS सेक्शन १२३ (माजी IPC ३२८) अंतर्गत हा प्रकार जाणीवपूर्वक विषारी घटकयुक्त पदार्थ देऊन जीवितास धोका निर्माण करणे या गुन्ह्यात मोडतो, असा दावा त्यांनी केला.

त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून तातडीने निलंबनासह कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

लोणार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली फिर्याद जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने ती जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आली आहे.
डॉ. गोपाल बछिरे यांनी सर्व पुरावे जिल्हाधिकाऱ्यांना दाखवून तात्काळ कारवाईचे साकडे घातले.

या वेळी गजानन जाधव, सुदन अंभोरे, तारामती जायभाये, लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, प्रकाश सानप, तानाजी मापारी, तानाजी अंभोरे, शालिनीताई मोरे, अशपाक खान, फहीम खान, अमोल सुटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

read also :https://ajinkyabharat.com/aryanchi-case-ladhanyas-veteran-vakilacha-denied/