मुकेश ढोके
अकोला : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात अकोला जिल्ह्यात नवदुर्गा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन यांसह अनेक सण उत्सव साजरे होणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेखाली (दि.१२) नियोजनभवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, अपर पोलिस अधीक्षक सीके रेड्डी आणि सार्वजनिक उत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, सर्व सार्वजनिक उत्सव मंडळांना लागणाऱ्या परवानग्या एका ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘एक खिडकी’ प्रणाली मनपाच्या वतीने राबविली जाईल. ग्रामीण भागातही पोलीस ठाण्यांमध्ये याची सोय करावी. तसेच सणाच्या काळात पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वच्छता, आरोग्य पथके आणि इतर आवश्यक सुविधा सुरळीतपणे उपलब्ध करून देण्यात येतील.मनपा आयुक्त डॉ.सुनील लहानेंनी ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्र फक्त ठरवलेल्या वेळेतच वापरण्याची परवानगी असेल.अपर पोलीस अधीक्षक सीके रेड्डी यांनी सांगितले की, आतापर्यंत १३५६ नवदुर्गा मंडळांची नोंदणी झाली आहे. सणाच्या काळात पोलीस बंदोबस्त तसेच दामिनी पथक सज्ज राहणार आहेत. कुठलीही गुन्हेगारी किंवा असुरक्षित हालचाल दिसल्यास तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल.निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी सांगितले की, नवरात्रीच्या अष्टमी व नवमीच्या रात्री रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्याची मुभा दिली आहे. उत्सव मंडळ व गरबा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विविध मागण्या मांडल्या, ज्यावर प्रशासनाने सकारात्मक विचार केला आहे.जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि प्रशासनाची सर्वांची विनंती आहे की, सर्व मंडळे नियमांचे पालन करतील आणि सण उत्सवाची परंपरा सुरक्षित, आनंदात आणि शांततेत साजरी केली जाईल.