धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा आणखी एक दणका; दोन याचिकांमध्ये प्रत्येकी ५ हजारांचा दंड
औरंगाबाद – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दोन वेगवेगळ्या निवडणूक संदर्भातील याचिकांमध्ये प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकूण १० हजार रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार, ही रक्कम औरंगाबाद खंडपीठ वकील संघास जमा करावी लागणार आहे.
राजाभाऊ फड आणि करुणा शर्मा यांनी २०१४ विधानसभा निवडणुकीतील मुंडेंच्या विजयाला आव्हान देत दोन याचिका दाखल केल्या होत्या.
यात बोगस मतदान, शपथपत्रात खोटी माहिती देणे आणि माहिती दडपल्याचे गंभीर आरोप करण्यात आले होते.
या प्रकरणात कोर्टाने शेवटची संधी देऊनही मुंडेंकडून लेखी उत्तर दाखल करण्यात आले नव्हते.
८ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी, नोटीसा मिळूनही प्रतिसाद न दिल्यामुळे, अखेर कोर्टाने प्रत्येकी ५ हजार असा एकूण १० हजारांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला.
अलीकडेच मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्याकांड व करुणा शर्मा प्रकरणामुळे धनंजय मुंडे सतत चर्चेत राहिले असून, आता न्यायालयीन दंडामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.