कारंजा (लाड) : उप-जिल्हा रुग्णालय कारंजा (लाड) येथे आज “सुप्रसिद्ध नारी, सशक्त परिवार” या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने हा उपक्रम १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण हे कुटुंब, समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याने या अभियानाचा उद्देश प्रत्येक महिलापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवणे आहे.उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे तेजस्विनी डहाके, शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली येळणे (शिंदे गट), जिल्हा प्रमुख प्रिया महाजन, जेष्ठ शिवसैनिक पावडे पाटील, माजी नगरसेविका प्राजक्ता ताई आणि उप-जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे उपस्थित होते.अभियानात महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या आयोजित केल्या जात आहेत, ज्यात उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा, स्तनाचा व गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग निदान, क्षयरोग तपासणी, निमिया तपासणी, गर्भवती महिलांची प्रसूतिपूर्व काळजी, हिमोग्लोबिन तपासणी, पोषण व काळजीबाबत मार्गदर्शन, तसेच बालकांचे लसीकरण यांचा समावेश आहे. याशिवाय आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, सिद्ध व नॅचरोपॅथी यासारख्या पर्यायी उपचार सेवा देखील उपलब्ध होतील.यावेळी “निक्षय मित्र” पुजा बागुल यांनी महिला टी.बी. रुग्णांना मोफत पोषण कीटचे वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुषमा उपाध्ये यांनी केले, तर प्रास्ताविक योगिता देशमुख यांनी मांडले. उप-जिल्हा रुग्णालयातील परिसेवकांचा मोठा सहभाग या कार्यक्रमाला लाभला.या शिबिरात अंदाजे ७००-८०० महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी सांगितले की, १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत विविध प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध राहतील.
read also : https://ajinkyabharat.com/meenatai-thackeray-putyawar-rangfaik-case/
