देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाला भगदाड

देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाला भगदाड

लोणार (प्रतिनिधी) | १५ जुलै २०२५

जगप्रसिद्ध लोणार सरोवराजवळील देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पात मोठे भगदाड पडल्याने

धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला असून, परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

२,४०८ दशलक्ष घनमीटर पाणधारण क्षमतेचा हा प्रकल्प २१ जुलैच्या रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शंभर टक्के भरलेला आहे.

धरणाच्या मध्यभागी असलेल्या दगडाच्या पिचिंगवर मोठे भगदाड पडले असून त्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा झराही वाहत आहे.

हे भगदाड अधिक खोल होण्याची शक्यता असल्याने भिंत कोसळण्याचा आणि धरण फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पाटबंधारे विभागाचा सतर्कतेचा इशारा

सध्या पावसाचे प्रमाण वाढलेले असतानाच धरणातून कालव्याद्वारे नियोजित विसर्ग सुरू असला तरी छिद्रातूनही अनियंत्रित पाणी वाहत आहे.

यामुळे लघुपाटबंधारे विभागाने ग्रामस्थांना तात्काळ सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

पूर्वीच दिलेल्या सूचना दुर्लक्षित

ग्रामस्थ आणि शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदू मापारी यांनी यापूर्वी अनेकदा धरण भिंतीवरील झाडे-झुडपे तोडावीत,

घुशींमुळे जमिनीत निर्माण झालेल्या पोकळी दुरुस्त कराव्यात अशी मागणी लघुपाटबंधारे विभागाकडे केली होती.

मात्र संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने भिंत आधीच कमकुवत झालेली आहे.

धरणातील उच्च दाबामुळे ती केव्हाही फुटू शकते, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

अन्यथा होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे विभाग जबाबदार असेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

पोलिस पाटलांकडून पाहणी

या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटील आसाराम खोमणे आणि परमेश्वर नरवाडे यांनी धरण परिसराची पाहणी केली

असून भिंतीतून वाहणाऱ्या प्रवाहाची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे.

पिकांचेही मोठे नुकसान

धरण परिसर व नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने हजारो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

त्यातच धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/rajya-sashevat-vikasasathi-professional-native-grand-jatan-and-promotion-garghe-kulguru-dr-sharad-gadakh-yancha-mat/