तेल्हारा : नुकत्याच पार पडलेल्या तेल्हारा नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) संदर्भात संशय व्यक्त करत पराभूत महिला उमेदवाराने पोलिसांत लेखी तक्रार दाखल केल्याने तेल्हारा शहरासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या शिवानी सचिन थाटे यांनी मतमोजणी प्रक्रियेदरम्यान घडलेल्या एका संशयास्पद घटनेचा उल्लेख करत तेल्हारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
शिवानी थाटे या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व नगरसेवा समिती यांच्या आघाडीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक रिंगणात होत्या. दिनांक २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. याच दरम्यान त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेश प्राप्त झाल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीनुसार, सकाळी १०:३६ वाजता संबंधित अज्ञात क्रमांकावरून “आप चुनाव हार रहे हो” असा संदेश प्राप्त झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत म्हणजेच सकाळी १०:४३ वाजता “९४१ व्होटोसे” असा दुसरा संदेश आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मतमोजणी सुरू असतानाच अशा स्वरूपाचे संदेश प्राप्त होणे हे संशयास्पद असल्याचे शिवानी थाटे यांचे म्हणणे आहे.
Related News
यानंतर जाहीर झालेल्या अधिकृत निकालात विजयी उमेदवार आणि शिवानी थाटे यांच्यातील मतांचे अंतर सुमारे १२४२ असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, मतमोजणी सुरू असतानाच पाठवण्यात आलेल्या संदेशांमधील आकडे आणि अंतिम निकालातील मतफरक यामध्ये साधर्म्य आढळून येत असल्याने ईव्हीएम प्रक्रियेबाबत तसेच संपूर्ण मतमोजणीबाबत संशय निर्माण झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तक्रारीत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा नमूद करण्यात आला असून, संबंधित अज्ञात मोबाईल क्रमांक हा व्हॉट्सॲप बिझनेस अकाऊंट असल्याचे दिसून येत आहे. त्या अकाऊंटवर “साकेतकुमार पी. एस. टू होम मिनिस्टर” असे नाव नमूद असून, सार्वजनिक व्यक्तीचे छायाचित्र व विशिष्ट चिन्हही त्या प्रोफाइलवर असल्याचे थाटे यांनी म्हटले आहे. मात्र या माहितीचा सत्य-असत्याबाबत कोणताही अधिकृत निष्कर्ष अद्याप काढण्यात आलेला नाही.
या संपूर्ण प्रकरणामुळे ईव्हीएमची सुरक्षितता, मतमोजणीची गोपनीयता तसेच निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. शिवानी थाटे यांनी पोलिसांकडे संबंधित मोबाईल क्रमांकाचा शोध घेऊन तो कोणी वापरत होते, संदेश कोणी आणि कोणत्या उद्देशाने पाठवले, तसेच यामागे कोणती यंत्रणा कार्यरत होती का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
या तक्रारीच्या प्रती निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी, अकोला यांच्याकडेही सादर करण्यात आल्या आहेत. सदर प्रकरणाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत चौकशी पूर्ण झालेली नसून, पोलिस तपासानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे तेल्हारातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
