रिसोड (जि. वाशीम) –विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसताना, रिसोड तालुक्यातील कोयाळी बु. येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दशरथ जाधव (वय ६२ वर्षे) या अल्पभूधारक शेतकऱ्याने मंगळवारी (दि. २३ सप्टेंबर) आपल्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावावर केवळ तीन एकर शेती असून, मागील काही वर्षांपासून पावसाच्या अनियमिततेमुळे त्यांना वारंवार नापिकीला सामोरे जावे लागत होते. परिणामी त्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत होती.याशिवाय, त्यांनी शेतीसह अतिरिक्त उत्पन्न मिळावे या उद्देशाने वाहतूक व्यवसायासाठी चारचाकी गाडी कर्जावर घेतली होती. मात्र, शेतीतील उत्पन्न घटल्याने गाडीवरील हप्ते वेळेवर भरता आले नाहीत. थकबाकी वाढत गेल्याने कर्जफेडीचा प्रचंड दबाव त्यांच्यावर आला . गावकऱ्यांनी सांगितले की, “सततच्या नापिकी, कर्जबाजारीपणा आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यामुळे जाधव मानसिक तणावाखाली होते. अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेत आपले आयुष्य संपवले.”घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.या घटनेनंतर जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावकऱ्यांतूनही या मृत्यूबाबत हळहळ व्यक्त केली जात असून शासनाने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संतोष जाधव यांची ही आत्महत्या पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वास्तव अधोरेखित करते. नापिकी, कर्जबाजारीपणा व शेतीवरील अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना टोकाला जावे लागते.
read also :https://ajinkyabharat.com/akot-shetkayancha-suit/
