मुंडगाव : मुंडगाव शेत शिवारातील अनुकूल सांगोळे यांच्या शेतात सोयाबीन सोंगणीसाठी गेलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याचा कोरड्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे.
मुंडगाव येथे शेतकऱ्यांची शेतातील सोयाबीन सोंगणीची लगबग सुरु आहे. अनुकूल सांगोळे यांच्या शेतातील सोयाबीन सोंगणीसाठी अमिनपुर मुंडगाव येथील काही मजुर व अल्पभूधारक ५५ वर्षीय शेतकरी पंजाब प्रल्हाद सोनोने दि.९ आक्टोबर रोजी सकाळी ५वाजता गेले. शेतातील तुरी मध्ये असलेले सोयाबीन पाहत असतांना ओसाड विहीर पंजाब सोनोने यांना दिसली नाही व ते विहिरीत पडल्याने विटा दगडाचा मार त्यांच्या डोक्याला लागला.त्याचा विहिरीत मृत्यू झाला.
सोबतच्या मजुरांना विहिरीत पडल्याचा आवाज आला व ते विहिरी जवळ धावतच गेले. त्यांना पंजाब सोनोने दिसले नाही. ही बातमी वाऱ्या सारखी संपुर्ण परीसरात पसरताच मुंडगाव सह अमीनपुरातील नागरिकांनी त्या विहिरीवर धाव घेतली. अनेक ग्रामस्थ दोराच्या साह्याने पाणी नसलेल्या विहिरीत उतरले व पंजाब सोनोने यांना पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती अकोट ग्रामीण पोलीसांना सुध्दा देण्यात आली.
येथील नागरीकांच्या मदतीने त्याचा मृतदेह येथील उपसरपंच तुषार पाचकोर यांच्या वाहनाव्दारे अकोट येथे हलविण्यात आला. अकोट ग्रामीण पोलीसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार किशोर जुनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार तोमर, खंडारे सह कर्मचारी करत आहे.