अमरावती : ‘देवमाणूस’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुख हिच्यासोबत मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अस्मितानं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकाराचं सत्य सांगितलं आहे. दहीहंडीच्या एका इव्हेंटदरम्यान इव्हेंट मॅनेजर सुजित सरकाळे यानं तिला पैशांच्या बाबतीत गंडवल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे.
अस्मितानं सांगितलं, “सुजित सरकाळे यानं मला इव्हेंट दिला. ठरल्याप्रमाणे अर्धे पैसे आधी मिळाले, उर्वरित पैसे इव्हेंटनंतर देणार असल्याचं सांगण्यात आलं. मी इव्हेंटला गेले, कार्यक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यानं मला पैसे पाठवल्याचे काही स्क्रीनशॉट्स दाखवले. मात्र, प्रत्यक्षात माझ्या खात्यात पैसे आलेच नव्हते. बँकेचा सर्व्हर डाऊन असल्याची कारणं देत तो वेळ काढत राहिला. आठवडाभरानंतर लक्षात आलं की, ही मोठी फसवणूक आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाली की, “हा स्कॅम फक्त माझ्यासोबत नाही, तर इतरांसोबतही होऊ शकतो. Phone Pay, Google Pay सारख्या माध्यमातून हा गंडा घातला जातो. मी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनाही त्यानं गंडवलं.”
तिनं सर्व कलाकारांना अलर्ट करत इशारा दिला आहे की, “सुजित सरकाळे या इव्हेंट मॅनेजरसोबत काम करू नका. कोणत्याही इव्हेंटला जाण्याआधी संपूर्ण पेमेंट खात्री करून घ्या, अन्यथा माझ्यासारखीच फसवणूक तुमच्यासोबत होऊ शकते.” अस्मितानं आपल्या व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे की, तिच्या अनुभवातून इतर कलाकारांनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.
read also : https://ajinkyabharat.com/pak-vs-ind-hindi-majal-171-runner/
