रिसोड शहरात पुन्हा एकदा जुन्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. या हल्ल्यात एका युवकाला जबर मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास रिसोड-सेनगाव मार्गावरील बाबासाहेब धाबेकर इंग्लिश स्कूलसमोर घडली.
वादाचे मूळ कारण
फिर्यादी सतीश प्रल्हाद जाधव (वय ३६, रा. घोन्सर, ता. रिसोड) यांचे शेजारी शंकर दत्ताराव काळे यांच्या घरासमोर मुरूम टाकल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून ते पाणी जाधव यांच्या घरासमोर साचू लागले. यावरून काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. गावातील नागरिकांनी तो वाद मिटविला होता.
हल्ल्याची थरारक घटना
१८ सप्टेंबर रोजी सकाळी सतीश जाधव आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यासाठी बाबासाहेब धाबेकर इंग्लिश स्कूल येथे गेले होते. मुलाला सोडल्यानंतर पावसामुळे ते शाळेतच थांबले. पाऊस थांबल्यानंतर ते शाळेतून मोटारसायकल काढत असताना अचानक त्यांच्या पाठीवर क्रिकेटची बॅटने जोरदार प्रहार करण्यात आला. प्रहार एवढा जोराचा होता की बॅट तुटून खाली पडली.पाठीमागे वळून पाहिले असता हल्लेखोर शंकर काळे दिसले. त्यानंतर विष्णू जाधव (रा. सवड) याने हातातील स्टीलच्या रॉडने सतत तीन-चार वार करून सतीश यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखालील हाड मोडले. त्यानंतर मंगेश काटे (रा. बेंदरवाडी, रिसोड) यानेदेखील रॉडने डाव्या पायावर प्रहार केला. त्यामुळे पाय सुजून काळे-निळे झाले.
धमकी आणि मारहाण
या हल्ल्यात इतर दोन-तीन तरुणांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हल्ल्यानंतर शंकर काळे याने “तु आता वाचलास, पण तुला पुढे कापून टाकतो” अशी उघड धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
नागरिकांचा हस्तक्षेप आणि पोलिस तपास
घटनेदरम्यान उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत सतीश जाधव यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.रिसोड पोलिसांनी शंकर काळे व इतर सहआरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
read also : https://ajinkyabharat.com/south-ashiyat-nave-equation/