ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस, 48 तासांचा अल्टिमेटम

ठेकेदाराला

त्र्यंबकेश्वरमध्ये साधू-महंतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नगरपरिषद अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर वाहन प्रवेश फी वसुलीचे कंत्राट देण्यात आलेल्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ठेकेदाराला 48 तासांच्या आत खुलासा करण्याचे निर्देश देण्यात आले असून, अन्यथा कंत्राट रद्द करण्यात येईल, असा इशारा नगरपरिषदेने दिला आहे.शनिवारी (20 सप्टेंबर) साधू-संतांच्या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेत ‘पुढारी’चे किरण ताजणे, ‘झी २४ तास’चे येमेश खरे आणि ‘साम टीव्ही’चे अभिजित सोनवणे हे पत्रकार गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी तातडीची कारवाई करत प्रशांत राजू सोनवणे, शिवराज आहेर आणि ऋषिकेश गांगुर्डे या तिघांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.नगरपरिषदेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाहन प्रवेश फी वसुलीचे वार्षिक 1 कोटी 8 लाख रुपयांचे कंत्राट नवी मुंबईतील ‘ए.एस. मल्टी सर्व्हिसेस’ या कंपनीकडे आहे. संबंधित कंपनीकडे सफाई, पाणीपुरवठा आणि पार्किंग वसुलीची जबाबदारीदेखील आहे. ठेकेदार अनिल शुक्ला यांनी स्थानिक अधिकाऱ्यांमार्फत वसुलीचे काम सुरू ठेवले असून, या अधिकाऱ्यांनी बाहेरील तरुणांची नियुक्ती केली होती. याच तरुणांकडून पत्रकारांवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “या घटनेमुळे नगर परिषदेची प्रतिमा मलिन झाली आहे. करारातील अट क्रमांक 3, 5 आणि 8 चा भंग करण्यात आला असून, घटनास्थळी वसुली दराचे बोर्ड देखील लावण्यात आलेले नव्हते. ही गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाची बाब आहे. 48 तासांच्या आत सविस्तर खुलासा द्यावा, अन्यथा कंत्राट रद्द करण्यात येईल.”

read also : https://ajinkyabharat.com/shraddha-anani-bhakti-place/