यवतमाळ: महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्ष राज्यातील बहुजन आणि मागास समाजाला डावलत असून, पक्षाची सूत्रे काही विशिष्ट जातींच्या हातात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून केला आहे.
पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात दीड कोटी बंजारा समाज असतानाही काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकाही बंजारा उमेदवाराला संधी दिली नाही. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि दिग्रस, कारंजा, यवतमाळ, बुलढाणा, परतूर-मंठा व जामनेर यांसारख्या बंजारा बहुल विधानसभा मतदारसंघांतही समाजाला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले नाही.
उमेदवारी वाटपातील जातीयवाद
पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारी वाटपावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या १७ जागांपैकी ९ उमेदवार मराठा-कुणबी समाजाचे होते. विधानसभा निवडणुकीतही १०२ पैकी ५१ जागांवर (५०%) मराठा-कुणबी समाजाला उमेदवारी देण्यात आली. याउलट, ओबीसी प्रवर्गातील फक्त ८ उमेदवारांना संधी मिळाली, ज्यात बंजारा, वंजारी आणि इतर अनेक समाजांचा समावेश नव्हता. हा जातीयवाद सातत्याने होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पक्षांतर्गत हुकूमशाही आणि गटबाजी
पवार यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, पक्षात सामाजिक न्यायाच्या गोष्टी केल्या जातात, पण प्रत्यक्षात बहुजनांच्या नेतृत्वांना पद्धतशीरपणे दडपले जाते. पक्ष संघटनाही विशिष्ट नेत्यांनी ‘हायजॅक’ केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक नेत्यांनी कर्तबगार बहुजनांना डावलून केवळ त्यांच्या लायक नसलेल्या मुलांना पुढे आणले आहे, ज्यामुळे पक्ष कमकुवत होत आहे.
हे सर्व पाहता, काँग्रेस हा आता मागासवर्गीय व बहुजनांचा पक्ष राहिला नाही, असे सांगत त्यांनी जड अंतःकरणाने राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/maratha-reservation-adyadhar-vivid-risod-taluk-aikya-vishal-algar/