ख्रिश्चन कॉलनी प्रकाशात न्हावून निघाली : गृहसणास उत्साहात सुरुवात

ख्रिश्चन धर्मियांच्या गृहसणास उत्साहात सुरुवात करण्यात आली असून, मंगळवार ११ नोव्हेंबर रोजी विदर्भातील एकमेव अशा ख्रिश्चन कॉलनीमध्ये सायंकाळी प्रकाशफेरी काढण्यात आली. यामुळे संपूर्ण ख्रिश्चन कॉलनी प्रकाशात न्हावून निघाली होती.
ख्रिसमस अर्थात नाताळ सणापूर्वी एक महिना अगोदर ख्रिश्चन धर्मियांच्या गृहसणास सुरुवात होते. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अकोला शहरात कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट या ख्रिश्चन धर्मियांच्या दोन पंथांची एकूण आठ प्रार्थनास्थळे अर्थात चर्च आहेत. या सर्व चर्चेसमधून नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गृहसणास सुरुवात होते. या गृहसणाच्या कालावधीत चर्चच्या प्रत्येक सदस्याच्या घरी भेट देवून त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली जाते.

 

त्यांची आपुलकीने विचारपूस केली जाते. मंगळवारी ख्रिश्चन कॉलनी येथील बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चचे रेव्हरंड निलेश अघमकर, सचिव सरला मेश्रामकर, खजिनदार अरविंद बिरपॉल, पंचमंडळ सदस्य राजेश ठाकूर, अमित ठाकूर, अजय वर्मा, चंद्रकांत ढिलपे आणि चर्चचे वडील जस्टीन मेश्रामकर यांच्या नेतृत्वात चर्चच्या परिसरातून संपूर्ण ख्रिश्चन कॉलनीमध्ये सायंकाळी साडेसात वाजता प्रकाशफेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व अबालवृद्धांनी आम्ही चालू प्रकाशात यासह इतरही अनेक गीते सादर करीत प्रत्येक सदस्याच्या घरी भेट देवून त्यांची आपुलकीने विचारपूस करीत त्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्यात.

यामध्ये कार्यकारी मंडळ, तरुण संघ, महिला संघ आणि संडेस्कूलची बच्चेकंपनीही सहर्ष सहभागी झाली होती. यावेळी चर्चचे रेव्हरंड निलेश अघमकर यांनी ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ बायबलमधील विविध वचनांच्या आधारे संदेश दिला. माझे घर हे प्रार्थनेचे घर होईल हे यावर्षीच्या गृहसणाचे ध्येयवाक्य आहे. सोमवार १० नोव्हेबर ते रविवार १६ नोव्हेबर या काळात हा गृहसण आणि चर्चमध्ये दररोज सायंकाळी संजीवनाच्या प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

आत्मिक सभांच्या संचलनाची जबाबदारी मीना बिरपॉल, सुवार्ता ढिलपे, उज्वला ठाकूर, डॉ. शीतल ठाकूर, पा. वैशाली डोंगरदिवे सांभाळणार आहेत. यावेळी रेव्हरंड निलेश अघमकर हे बायबलमधील वचनांच्या आधारे गृहसणावर संदेश देतील. त्यानंतर रविवार २३ नोव्हेबर रोजी चर्चच्या आवारात हंगामाचा सण साजरा करण्यात येईल. यावेळी परंपरेनुसार, चर्चच्या सदस्यांनी आणलेल्या विविध वस्तूंचा लिलाव करुन जमा झालेला निधी चर्चाच्या विकासासाठी राखून ठेवण्यात येईल. १२ नोव्हेबर ते १५ नोव्हेबर या कालावधीत आयोजित संजीवनाच्या आत्मिक सभांचा लाभ घेण्याचे आवाहन बेथेल सेव्हिअर्स अलायन्स चर्चच्या कार्यकारी मंडळाने केले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/bomb-threat-to-air-india-express-flight-176-a-terrible-incident-with-fatal-danger-for-passengers/