अडगाव बु – सततच्या पावसामुळे कपाशी पिकात तणाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चात मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर कपाशी उत्पादकांना दिलासा मिळावा म्हणून तणाला प्रतिकारक तंत्रज्ञान (हर्बीसाइड टॉलरंट–एचटीबीटी) ला तात्काळ मान्यता द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या (रघुनाथ दादा पाटील) वतीने केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या दिवसात वाढ होत असून काही भागात आठ-दहा दिवसांत महिनाभराचा पाऊस कोसळतो. अशा काळात पिकांतील तण नियंत्रण शेतकऱ्यांना करणे कठीण जाते. त्यामुळे मजुरी खर्चात मोठी वाढ होते. दुसरीकडे बाजारात कापसाला अपेक्षित दर न मिळाल्याने वाढीव उत्पादन खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे.राज्यात सुमारे ४० ते ४२ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होत होती. मात्र खर्च, उत्पादन आणि उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने हे क्षेत्र कमी होऊन आता सुमारे ३८ लाख हेक्टरवर आले आहे. विदर्भात १८ लाख हेक्टरवर कपाशी लागवड होत असताना यातही घट झालेली दिसते. नगदी पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या क्षेत्रात घट होणे म्हणजे शेतकऱ्यांमधील वाढत्या अस्वस्थतेचे लक्षण असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील, विदर्भ अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, नानासाहेब क्रांती ब्रिगेडचे शिवाजीराव नादखीले व पंकज माळी यांनी दिल्लीत भेटीदरम्यान केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदन सादर केले.
“शासनाची मान्यता नसल्याने शेतकरी एचटीबीटीची अनधिकृत लागवड करतात. यात मोठ्या प्रमाणात त्यांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने याला रितसर मान्यता देण्याची गरज आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी पाठपुरावा करावा,”
– लक्ष्मीकांत कौठकार, विदर्भ अध्यक्ष, शेतकरी संघटना (रघुनाथ दादा पाटील)
शेतकरी संघटनेच्या या मागणीमुळे एचटीबीटी तंत्रज्ञानाला मान्यता द्यावी का, याकडे आता राज्यासह केंद्र सरकारचे लक्ष लागले आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/maharashtra-state-dhobi-parit-varathi-samaj-federation-session-today/
