शांतता राखण्यासाठी पोलिसांचे आवाहन

डीजेचे नियम पाळा, अन्यथा कारवाई

अकोट: नवदुर्गोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त अकोट उपविभागात शांतता कायम ठेवण्याचे आवाहन अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे. यासंदर्भात अकोट येथील श्रीहरी हॉटेलमध्ये शांतता समितीची सभा पार पडली, ज्यामध्ये अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील, अकोट तहसीलदार डॉ.सुनील चव्हाण, अकोट शहराचे ठाणेदार अमोल माळवे तसेच तेल्हारा, हिवरखेड, दहीहांडा येथील ठाणेदार उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना सण-उत्सव काळात शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, अकोट शहरात डीजेच्या ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर केला जावा. पोलिसांनी सर्व तयारी केली असून, मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त, महिलांसाठी दामिनी पथक, रहदारीसाठी ट्रॅफीक पोलिस आणि ड्रोन कॅमेरे यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गुन्हेगारांना सण-उत्सव काळात बाहेर काढण्याचे काम देखील सुरू राहणार आहे. शांतता समितीच्या सभेत नगरपालिकेला मिरवणूक मार्गावरील खड्डे आणि इतर समस्या तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील यांनी सांगितले की, डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, तसेच सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकू नयेत. तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनीही नागरिकांना सूचित केले की, शांतता भंग करणाऱ्यांवर लक्ष ठेवून वेळीच कारवाई केली जाईल.

read also:https://ajinkyabharat.com/owner/