मेहकर : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण तात्काळ मिळावे या ठाम मागणीसाठी बुलढाणा जिल्ह्यात आज बंजारा समाजाचा भव्य आणि ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पुरुष, महिला, तरुण-तरुणींच्या उपस्थितीने संपूर्ण शहर अक्षरशः ठप्प झाले होते. लाखोंच्या संख्येने उसळलेल्या जनसागरामुळे बुलढाणा शहरात उत्साह आणि रोषणाईचे वातावरण निर्माण झाले.हा मोर्चा जिल्ह्यातील नव्हे तर विदर्भातील सर्वात मोठा ठरल्याची चर्चा जनसामान्यात रंगली होती. “इतका मोठा मोर्चा बुलढाण्यात याआधी कधीच पाहिला गेला नाही” असे अनेक ज्येष्ठ नागरिक बोलताना म्हणाले.
संत-महंतांचा प्रभावी सहभाग
या मोर्चामध्ये बंजारा समाजाचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेते एकत्र आले होते. पोहरादेवी येथील पिठाचे सुनील महाराज, महंत रायसिंग महाराज, महंत हिम्मत महाराज, महंत रामदास महाराज आदींच्या उपस्थितीने समाजातील संत-महंतांनी या लढ्याला धार्मिक आणि नैतिक पाठबळ दिले. समाजाच्या हक्कासाठी आध्यात्मिक व सामाजिक नेते एकत्र आल्याचे दुर्मिळ चित्र मोर्च्यात दिसून आले.
नेते व पदाधिकाऱ्यांची एकजूट
हरीभाऊ राठोड, संजय राठोड, अभय चव्हाण यांच्यासह आजी-माजी विविध संघटनांचे पदाधिकारी या मोर्चात सक्रीय सहभागी झाले. समाजातील लहान-मोठ्या सर्व संघटनांनी एकवटून आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी “आरक्षण आमचा जन्मसिद्ध हक्क आहे”, “हैदराबाद गॅझेट लागू करा”, “बंजारा समाजाला न्याय द्या” अशा गगनभेदी घोषणा बुलढाणा शहरात घुमल्या.
प्रभावी सूत्रसंचालन
या भव्य मोर्च्याचे सूत्रसंचालन प्रा. अरविंद चव्हाण यांनी करताना समाजातील ऐक्य, आरक्षणाची गरज आणि न्याय्य हक्क यावर प्रभावीपणे प्रकाश टाकला. त्यांच्या जोशपूर्ण आवाजाने उपस्थित जनसमुदायामध्ये नवीन ऊर्जा संचारली.
शासनाविरुद्ध रोष
मोर्चामध्ये उपस्थित नेत्यांनी शासनाच्या विलंबित भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. “इतक्या वर्षांपासून बंजारा समाज न्यायासाठी लढतो आहे, पण अद्याप शासन झोपेत आहे. आता आम्ही शांत बसणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरू राहील,” असा इशारा देण्यात आला.
ऐतिहासिक घटना
या मोर्च्याला इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवले जाईल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. बुलढाण्यातील लोकांनी एवढ्या मोठ्या संख्येने समाजाची एकजूट, शिस्तबद्धता आणि जिद्द याचा अनुभव घेतला. समाजातील प्रत्येक घटक—महिला, तरुणाई, ज्येष्ठ नागरिक—यांनी एकदिलाने सहभाग घेतल्याने बंजारा समाजातील ऐक्य आणि दृढनिश्चय याचे दर्शन घडले.बंजारा समाजाचा हा बुलंद आवाज आता शासनाच्या कानावर जाईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
read also : https://ajinkyabharat.com/mahur-darshanasathi-navratri-special-bus-service/
