अकोला : सणासुदीच्या दिवसात शहरात मागील दोन आठवड्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.त्यामुळे अकोला शहरातील नागरिकांना या सणासुदीच्या दिवसात नाहक त्रास सोसावा लागत आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीद्वारे ग्राहकांसाठी गॅस एजन्सी मार्फत पुरविण्यात येणारे एच.पी. गॅस सिलेंडर गेल्या दोन आठवडयापासून पुरविण्यात असुविधा होत असल्याने ग्राहकांना अवैध सिलेंडर विक्री करणाऱ्यांकडून जादा दराने सिलेंडर घ्यावे लागत आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक गळचेपी होत आहे
घरगुती गॅस सिलेंडरची ऑनलाइन व प्रत्यक्ष नोंदणी केल्यास २ दिवसांत तो मिळण्याची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली आहे. त्या सवयीनुसार सिलेंडरची नोंदणी केल्यावर २ दिवसांत सिलेंडर आला नाही. दोन दिवसाचे ५ दिवस झाले तरी सिलेंडर न आल्याने जनतेची एकच तारांबळ उडत आहे.जो तो सिलेंडरची गाडी कधी येते याची वाट पाहू लागला आहे.
हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीद्वारे गॅस सिलेंडरचा पुरवठा गॅस वितरकांना होत नसल्याने गॅस सिलेंडर चा तुटवडा भासत आहे.दोन ते तीन दिवसात सिलेंडर मिळतील कंपनी कडून सिलेंडर पुरवठा उशिराने होत असून आठवड्यातुन एकदाच कंपनी सिलेंडर पुरवठा करीत असल्याचे गॅस सिलेंडर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना गॅस एजन्सी मध्ये काम करणारे कर्मचारी सांगत आहेत. गॅस वितकर (एजन्सी) चा कर्मचारी बुकिंग केलेले सिलेंडर घरपोच आणून देण्यासाठी ३० ते ४० रुपये घेत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. तसेच १० दिवसापूर्वी नोंदणी केलेल्यानां सिलेंडर न देता एका दिवसापूर्वी नोंदणी केलेल्यानां सिलेंडर दिला जात असल्याचा आरोप काही ग्राहकांनी केला आहे.
जुने शहरातील गॅस वितरक (एजन्सी) येथे एच.पी. सिलेंडर बुकिंग केलेल्या ग्राहकांना सिलेंडर न मिळत असल्याने त्यांना रिकामे हात परत जावे लागत असून ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.परिणामी अवैध गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यांची चांदी होत असून ते जादा दराने सिलेंडर विक्री करीत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
नेमके कशामुळे गॅस सिलेंडर चा तुटवडा होत आहे याप्रकरणी सविस्तर माहिती घेण्यासाठी जुने शहरातील गॅस वितकर (गॅस एजन्सी) वितरकांना संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क झाला नाही, तसेच पुरवठा विभागाशीही संपर्क साधला असता त्यांचाही संपर्क न झाल्याने ग्राहकांना सिलेंडर का उपलब्ध होत नाही नेमके कारण काय, याची सविस्तर माहिती न मिळाल्याने नेमके काय कारण आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील दोन आठवड्यापासून विविध गॅस एजन्सीला त्यांच्या मागणीनुसार घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा होत नाही. अनेक ग्राहक नेहमीच्या सवयीप्रमाणे गॅस सिलेंडर गाडी आल्यावर त्या ठिकाणी जाऊन बुकिंग करतात आणि त्यानंतर त्यांना त्वरित सिलेंडर दिला जातो किंवा त्याच दिवशी दिला जातो, अशी प्रक्रिया काही ठिकाणी राबवली जात आहे,परिणामी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसू लागला आहे.त्यामुळे ग्राहकांनी त्यांना कंपनीने दिलेल्या संपर्क क्रमांकावर मिस कॉल देऊन किंवा संपर्क करुन गॅस सिलेंडरची आगाऊ नोंदणी केली, तर योग्य प्रमाणात नोंदणी कंपनीला प्राप्त होऊन सिलेंडरचा पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.