पातुर : पातुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोडखा शेत शिवारात शेतकऱ्यांचा मोटर पंप चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक पांडुरंग वाहोकार यांचे शेत सर्वे नं. 10/1 गिट्ठीखदान रोड, बोडखा शिवारात आहे. त्यांनी विहिरीवर सिंचनासाठी पाणबुडी मोटर पंप बसवलेला होता. 17 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास शेतात गेले असता विहिरीवरील पाईप कापलेले आढळले. पुढे पाहणी केली असता मोटर पंप गायब झाल्याचे लक्षात आले. याबाबत वाहोकार यांनी 18 सप्टेंबर रोजी पातुर पोलिसात तक्रार नोंदवली.सदर मोटर पंप चार-पाच वर्षांपूर्वी खरेदी केलेला असून त्याचे बिल उपलब्ध नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र मोटर ओळखता येईल, असे शेतकऱ्याने सांगितले आहे.दरम्यान, पातुर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोटर पंप चोरी करणारी गॅंग सक्रिय झाल्याची चर्चा सुरू आहे. काही काळापूर्वी पातुर पोलिसांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी अशा गॅंगवर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. मात्र पुन्हा चोरीच्या घटना वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे.
read also : https://ajinkyabharat.com/rangist-karviyanti-participation-suru/