Bigg Boss Marathi 6 : घरात शिस्तीचा बोजवारा, बिग बॉसचा मोठा निर्णय; राखी सावंतकडे सोपवली घराची धुरा
Bigg Boss Marathi 6 च्या घरात दिवसेंदिवस वाढत चाललेला बेशिस्तपणा अखेर Bigg Boss च्या अंगाशी आला असून, सदस्यांना वठणीवर आणण्यासाठी Bigg Boss ने थेट कठोर पाऊल उचललं आहे. आजच्या भागात घरातील भांडणं, कचऱ्यावरून झालेली घाणेरडी कृत्यं आणि वैयक्तिक वाद यामुळे वातावरण अक्षरशः तापलेलं पाहायला मिळालं. या सगळ्या गोंधळानंतर Bigg Boss ने घराचा कारभार सांभाळण्यासाठी एक “खास व्यक्ती” नेमली असून, त्यामुळे घरात नवा ट्विस्ट आला आहे.
कचऱ्यावरून सुरू झालेला वाद, घरात तुफान गोंधळ
कालच्या भागाची सुरुवातच भांडी नीट न घासल्यावरून झालेल्या वादाने झाली. याच मुद्द्यावरून सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. राखीने सगळ्यांनाच कामचोर ठरवत आक्रमक भूमिका घेतली. दीपालीने राखीच्या बाजूने बोलत वादाला आणखी हवा दिली. रागाच्या भरात राखीने किचनमधील कचरा उचलून रुचिता आणि रोशन जिथे बसले होते तिथे टाकला. या कृत्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झालं.
रुचितानेही शांत न राहता तोच कचरा उचलून राखीच्या बेडवर टाकला. यानंतर तन्वीने रुचिताला सुनावलं, तर दीपालीने थेट नाश्ता न बनवण्याचा निर्णय जाहीर केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच विशालने राखीच्या बेडवरचा कचरा उचलला, तर अनुश्रीने किचन साफ करून परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, राखी इथेच थांबली नाही. तिने पुन्हा एकदा कचरा आणून रुचिताच्या बेडवर टाकला. अखेर सागर आणि सचिनने पुढे येत बेडवरचा कचरा साफ केला.
Related News
वैयक्तिक भांडणं, आरोप-प्रत्यारोप आणि वाढता तणाव
या सगळ्या गोंधळात रुचिता आणि प्रभू यांच्यातही जोरदार बाचाबाची झाली. राखी थेट डायनिंग टेबलवर चालत गेल्याने सगळेच स्पर्धक तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र राखीचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. प्रत्येकाशी तिचं भांडण होत राहिलं. राखी आणि रुचिताच्या वादात प्रभू उडी घेतो, यानंतर इतर सदस्य त्याची मजा घेतात.
तन्वीने रुचिताला “विशाल तुझा गेम आहे” असं म्हणत टोमणा मारला. राखीने यात आणखी तेल ओतत मुद्दाम रुचिताचं नाव घेत तिला जळवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांनी मिळून रुचिताचा बेड साफ केल्यावर राकेशने सचिनला याबाबत विचारणा केली. पुढे सचिन आणि राखीमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलं. “विशाल सगळ्यांना वापरतो आणि फेकतो,” असा थेट आरोप राखीने केला.
या सगळ्या गोंधळात प्राजक्ता एकटीच शांत बसलेली दिसली. राकेश तिला समजावण्याचा प्रयत्न करताना दिसला. सागर राखीसोबत फ्लर्ट करत असल्याचंही काही क्षणांसाठी पाहायला मिळालं. पुढे अनुश्री टोळीच्या विरोधात तन्वीसोबत चर्चा करते, तर दीपाली रुचिताला तिच्या खेळावरून समजावते.
Bigg Boss चा कठोर निर्णय; राखीला शिक्षा
घरात सुरू असलेल्या या घाणेरड्या प्रकाराची दखल घेत Bigg Bossने अखेर हस्तक्षेप केला. राखीला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. राखीने केलेल्या बेशिस्त आणि घाणेरड्या वागणुकीवर Bigg Boss प्रचंड नाराज झाले. “आपली या घरात जागा नाही,” अशा कठोर शब्दांत बिग बॉसने राखीला सुनावलं. त्यानंतर बिग बॉसची टीम घरात येते आणि राखीला थेट घराबाहेर नेलं जातं.
मात्र इथेच ट्विस्ट आहे. राखीला घराबाहेर न काढता तिला एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं. घराचा कारभार सांभाळण्यासाठी, तंटोजीराव भांडकुदळे यांची उत्तराधिकारी म्हणून राखी सावंत हिची निवड करण्यात आली. जोपर्यंत घराचा अधिकृत कॅप्टन निवडला जात नाही, तोपर्यंत राखीच घराची सूत्रं सांभाळेल, असं बिग बॉसने जाहीर केलं. या निर्णयामुळे घरात एकच खळबळ उडाली आहे.
नॉमिनेशन टास्क : कोण कोणाच्या रडारवर?
कालच्या भागात नॉमिनेशन टास्कही पार पडला. या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकाला दोन सदस्यांना नॉमिनेट करायचं होतं. ज्या सदस्यांना सर्वाधिक नॉमिनेशन्स मिळतील, ते या आठवड्यात धोक्यात येणार होते.
पहिल्या फेरीत अनुश्रीने प्राजक्ताला नॉमिनेट करत तिच्याकडे ठोस रणनीती नसल्याचं कारण दिलं. त्यानंतर तिने सचिनलाही नॉमिनेट केलं. यावर प्राजक्ताने विशालला “अनुश्रीवर विश्वास ठेवू नका,” असा सल्ला दिला.
दुसऱ्या फेरीत दीपालीने रुचिताला नॉमिनेट करत ती विशालच्या सांगण्यावरून खेळते, असा आरोप केला. यावरून दीपाली आणि रुचितामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. दीपालीने सचिनलाही नॉमिनेट केलं. पुढे सागरने दीपाली आणि राकेशला नॉमिनेट करत सगळ्यांनाच धक्का दिला.
विशालने प्रभू आणि दीपाली यांना नॉमिनेट केलं. “मला रुचिता आवडते हे मी सगळ्यांसमोर मान्य करतो. आमच्यात १५ वर्षांचा फरक असला तरी मला काही फरक पडत नाही,” असं वक्तव्य करत विशाल पुन्हा चर्चेत आला. यानंतर दीपाली आणि रुचितामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध पाहायला मिळालं.
राकेशने प्राजक्ता आणि सचिन यांना नॉमिनेट केलं, तर शेवटी प्राजक्ताने अनुश्री आणि प्रभूला नॉमिनेट केलं. त्यामुळे आता या आठवड्यात कोण कोण नॉमिनेट होणार, आणि राखी सावंत घराची धुरा कशी सांभाळणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/bigg-boss-marathi-6-fifth-week-bhaucha-double-push-both-members-out-of-the-house/
