मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणावाने कळस गाठला असून होर्मुज खाडी परिसरात घडामोडींना वेग आला आहे. इराणने आता थेट इशारा देत या समुद्री मार्गातून जाणाऱ्या जहाजांसाठी कठोर भूमिका जाहीर केली आहे. दुसरीकडे अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध पाच दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केल्याने जागतिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाला होता. विशेषतः होर्मुज खाडी हा जगातील सर्वात महत्त्वाचा तेलवाहतुकीचा मार्ग मानला जातो, त्यामुळे येथे निर्माण झालेला तणाव जागतिक अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.
ट्रम्प यांचा यू-टर्न; युद्धाला तात्पुरती स्थगिती
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी इराणविरुद्ध सुरू असलेले लष्करी कारवाई पुढील पाच दिवसांसाठी थांबवली आहे. “काही सकारात्मक हालचाली दिसत आहेत,” असे सांगत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. मात्र, या निर्णयामागे अमेरिका दबावाखाली आल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झाली आहे.
Related News
यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज खाडी खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला होता. तो वेळ संपल्यानंतर मोठा हल्ला होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण प्रत्यक्षात युद्ध थांबवल्याने अमेरिकेच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इराणची कठोर भूमिका; चर्चेला स्पष्ट नकार
इराणने मात्र आपली भूमिका अजिबात बदललेली नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “गेल्या 24 दिवसांत आमच्यावर झालेले हल्ले विसरता येणार नाहीत. त्यामुळे अमेरिकासोबत कोणतीही चर्चा होणार नाही.”
इराणकडून असा आरोप करण्यात आला की, अमेरिकेने त्यांच्या रुग्णालयांवर, शाळांवर आणि इतर नागरी ठिकाणांवर हल्ले केले. “आम्ही तसा प्रत्युत्तर दिला नाही. मात्र, जर आमच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले झाले, तर आम्हीही कठोर प्रत्युत्तर देऊ,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
होर्मुज खाडीत अडकलेल्या जहाजांवरून मोठा इशारा
सध्या होर्मुज खाडीमध्ये काही जहाजे अडकलेली असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत इराणने स्पष्ट केले की, ही जहाजे सुरक्षित बाहेर काढायची असतील, तर संबंधित देशांनी इराणी अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करावी लागेल.
इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुख्य समुद्री मार्गात विविध प्रकारच्या नौदल सुरंग (माईन्स) लावण्यात आले आहेत. त्यामुळे कोणतीही चुकीची हालचाल मोठा स्फोट घडवू शकते. “जर समुद्रात काही दुर्घटना घडली, तर त्याची पूर्ण जबाबदारी अमेरिका आणि इस्त्रायलवर असेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होण्याची भीती
होर्मुज खाडी हा मार्ग जगातील सुमारे 20% तेलवाहतुकीसाठी वापरला जातो. त्यामुळे येथे तणाव वाढल्यास तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम भारतासह अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो.
विशेषतः भारतसारख्या देशांना मोठा फटका बसू शकतो, कारण भारत मोठ्या प्रमाणावर तेल आयात करतो. जर हा मार्ग बंद झाला किंवा धोकादायक झाला, तर इंधन दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढे काय ?
सध्या अमेरिकाने युद्धाला तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी इराण अजूनही आक्रमक भूमिकेत आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असून, पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष आता होर्मुज खाडीकडे लागले आहे. जर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, तर त्याचे परिणाम जागतिक स्तरावर गंभीर असू शकतात.
