उमरा परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांना जीवितहानीची भीती

बिबट्या

अकोट – अकोट तालुक्यातील उमरा परिसरात रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या आणि पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नागरिकांनी वनविभागाकडे बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

उमरा आणि जितापूर माऊली परिसरातील नागरिकांच्या मते, भुकेने व्याकूळ असलेल्या या बिबट्याला रस्त्यावर व परिसरात सहज नजरेस येत असल्यामुळे रात्रीच्या वेळेस ये-जा करणारे वाहनचालक घाबरून जात आहेत. अनेक शेतकरी आणि ग्रामस्थांनी याबाबत सखोल चिंता व्यक्त केली आहे. “बिबट्याला अचानक रस्त्यावर पाहून वाहन चालवताना भिती वाटते, तसेच रस्त्यावरून सुरक्षितपणे जाणे धोकादायक झाले आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

उमरा परिसरात मोठ्या प्रमाणावर शेती असून शेतकरी नागरिकांच्या जनावऱ्यांची संख्याही जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांकडे शेळ्या आणि मेंढ्यांचा व्यवसाय असल्याने, बिबट्याच्या मुक्त संचारामुळे जनावऱ्यांचे रक्षण करणे ही मोठी चिंता ठरत आहे. याशिवाय, गहू, हरभरा, कांद्याच्या हंगामात शेतकरी रात्री शेतात जात असल्याने बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे त्यांच्या सुरक्षिततेस गंभीर धोका निर्माण झाला आहे.

मागील महिन्यात, याच बिबट्याने जितापूर गावाजवळ दोन गुरांची शिकार केली होती. शेतकऱ्यांनी याबाबत लेखी तक्रार दिली असली तरी संबंधित वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये वनविभागाच्या उपेक्षेबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि नागरिकांनी बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोरदारपणे केली आहे.

आरएफओ अकोला विश्वास थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, “लवकरात लवकर परिसरात गस्त घालून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात येईल. शक्यतो रात्रीच्या वेळेस शेतात किंवा रस्त्याने जाणे टाळावे.” तथापि, नागरिकांनी वनविभागाकडे कठोर पावले उचलून या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शेतकरी किशोर झगडे यांनी म्हटले, “मागील महिन्यात जितापूर परिसरात याच बिबट्याने दोन गुरांची शिकार केली, तक्रार दिल्यानंतरही वनविभागाने कोणतीही कारवाई केली नाही. मनुष्यांचा बळी गेला की तेव्हाच निद्रा अवस्थेतून जागे होणार का?” अशी नाराजी व्यक्त केली आहे.

परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी रात्रीच्या वेळेस रस्त्यावरून जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या जनावऱ्यांचे रक्षण करण्यासाठी अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.सध्या उमरा आणि जितापूर माऊली परिसरातील शेतकरी आणि नागरिक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाच्या त्वरीत कारवाईची अपेक्षा करत आहेत. वन्य प्राण्यांचा आणि मानवी जीवनाचा समतोल राखणे आवश्यक असल्याने, प्रशासनाने लवकरात लवकर या प्रकरणात कृती करणे गरजेचे आहे.

read also : https://ajinkyabharat.com/uk-muslim-population-growth-muslims-in-london-will-increase-by-44-estimated-figures-by-2025/