भूमिपुत्र शेतकरी संघटनेचा रिसोड तहसीलवर मोर्चा

ओला दुष्काळ जाहीर करा ; शेतकऱ्यांची मागणी

रिसोड :वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मालेगाव तालुक्यात सतत कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन, तूर, ज्वारी, हळद, कपाशी, उडीद, मुग तसेच भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासह शेतीसाठी उभारलेली ड्रिप, स्प्रिंकलर पाईप, सोलार साहित्य, विद्युत पोल व शेतीपयोगी साहित्य वाहून गेले. तरीही शासनाकडून शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळाली नसल्याने भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.आज (गुरुवार, दि. २५ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता पुंडलीक चौक (लोणी फाटा) येथून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. या वेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणे, पीकविमा नियम शिथिल करणे, तसेच मदतीत वाढ करणे या प्रमुख मागण्या या मोर्चातून करण्यात आल्या. शासनाने लवकरच निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/ulthavayin-mulivar-atrocities-karanya-karanya-karanya-gunha-prasar/