Beed Viral video: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून तिघांनी मिळून मुलाला लाथा-बुक्यांनी मारलं; बीडमधला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल, दमानियांनी व्यक्त केला संताप
काय आहे प्रकरण?
बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच त्याची दखल पोलिसांनी घेतली आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माने, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत मारहाण केली.. तसेच तू आता गावातच राहायचे नाही अशी धमकी देखील दिली.
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात होती. गुन्हा दाखल असला अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ अंबाजोगाई येथील दस्तगीरवाडी इथला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. कृष्णा साळे नावाच्या तरुणाला 3 तरुणांनी मारहाण केली.
या मुलाला काही या तीन मुलांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे. ‘इथं काय दादागिरी करायला का, खपवून घेणार नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही.
फोन कर’ असं म्हणत लाथा बुक्याने या तरुणाला मारहाण केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात आता गुन्हा दाखल झालेला आहे.
अंजली दमानियांनी व्हिडिओ शेअर करत व्यक्त केला संताप
दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पोस्टमध्ये,
“बीडच्या आंबेजोगाई मधे पुन्हा मारहाण। तुला खल्लासच करतो म्हणत कृष्णा साळे, या दस्तगीरवाडी येथील अल्पवयीन मुलास रिंगण करून मारलं आहे. त्याचे पैसे घेतले, मोबाईल हिसकावला गेला.
पोलीसांनी अट्रॉसिटी एक्ट खाली गुन्हा नोंदवला. एकाला अटकही झाली. पण बीडचे काही तरुण सुधरत नाहीत असे दिसतय, एसपी नवनीत कावत यांचे आभार”, लिहलं आहे.