आग्रा-लखनऊ हायवे मार्गावर बसची ट्रकला धडक, 5 ठार, 9 जखमी

नवी दिल्ली: आग्रा-लखनऊ एक्सप्रेस हायवेवर एक मोठा भीषण अपघात घडला आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला एका बसने जोरात धडक दिली आहे. या धडकीमध्ये बसमधील 5 प्रवाशांच्या मृत्यु झाला असून 9 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच एका प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. अशी माहिती बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस मथुरेहून लखनऊला जात होती. दरम्यान फिरोजाबाद जवळ महामार्गावर उभ्या ट्रकला पाठीमागून येणाऱ्या बसने धडक दिली. बसमध्ये सुमारे २५ प्रवासी प्रवास करत होते. यात ८ लहान मुलांचाही समावेश होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद अवस्थेतील बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचालक मद्यपान करून गाडी चालवत असल्याने त्याने महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली आहे.

 

जखमींना त्वरित रूग्णालयात दाखल करण्यात आले

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर फिरोजाबादच्या रुग्णालयात उपचार सुरू असून, गंभीर अवस्थेतील एकाला आग्र्याच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेने महामार्गावर प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनचालकांना अधिक सतर्कता पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह 

पोलिसांनी अपघाताच्या अनुषंगाने तपास सुरू केला असून चालकाच्या मद्यधुंद अवस्थेतील वाहन चालवण्याच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप प्रवाशांचे प्राण गेले आहेत. या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याआधी सहारनपूर जिल्ह्यात गंगोह पोलीस स्टेशन परिसरात एक मोठा रस्ता अपघात घडला होता. या अपघातात दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळल्याने प्रवाशांपैकी दोन जण जागीच मृत्युमुखी पडले, तर एकाने हेल्मेट घातल्यामुळे त्याचे प्राण वाचले.