Tribal Protest : नंदुरबारमध्ये आदिवासी समाज रस्त्यावर,आरक्षण बचावासाठी बांधली वज्रमूठ
नंदुरबार – राज्यात हैदराबाद गॅझेट लागू केल्यामुळे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीवर आदिवासी समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या मागणीच्या विरोधात आदिवासी समाज शहादामध्ये आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरला असून ‘आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा’ काढण्यात आला.हजारो आदिवासी बांधवांनी मोर्च्यात सहभाग घेत आरक्षणाचे संरक्षण करण्याची मागणी केली आणि बंजारा समाजाच्या मागणीला जोरदार विरोध केला. आदिवासी समाजाचे प्रतिनिधी आणि संघटना या आंदोलनामध्ये एकत्र आले असून सर्व राजकीय पक्षांचे नेतेही उपस्थित होते.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी स्पष्ट केले की, हैदराबाद गॅझेटमुळे कोणत्याही समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाला धोका नाही. तथापि, आदिवासी समाजाने आरक्षण बचाव मोर्चा काढून आपली तटस्थ भूमिका दर्शवली आहे.भाजपाचे आमदार राजेश पाडवी म्हणाले की, आदिवासी समाजाच्या मागणीची दखल राज्य शासन लवकरच घेईल. काँग्रेसचे माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले की, घटनेने अनुसूचित जमातीस दिलेला आरक्षणाचा अधिकार कायम राहणार असून भविष्यात कोणीही यामध्ये प्रवेश करु शकणार नाही.आंदोलनादरम्यान आदिवासी बांधवांनी जोरदार एल्गार पुकारला आणि आरक्षणाच्या अधिकाराचे संरक्षण करण्यासाठी सरकारकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
read also : https://ajinkyabharat.com/pungi-vajali-sarkar-of-kan-dar-taun-ahe/
