कानशिवणी (प्रतिनिधी):
मोरगाव काकड मार्गावरील राधाकृष्ण जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी येथे भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) अंतर्गत कापूस खरेदी प्रक्रियेला अधिकृत सुरुवात करण्यात आली. कापूस खरेदीच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला असून, सकाळपासूनच शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणण्यास सुरुवात केली होती.
कापूस खरेदीचा शुभारंभ उषाताई विनायकराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांच्या वाहनाचे पूजन व हारार्पण करून कापूस खरेदी प्रक्रियेची विधिवत सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आलेले शेतकरी रामदास पुंडलिक वाघमारे यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कानशिवणी परिसर हा कापूस उत्पादनासाठी ओळखला जातो. मागील काही दिवसांपासून शेतकरी कापूस खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा करत होते. अखेर सीसीआयमार्फत अधिकृत कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासगी व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या दरकपातीपासून संरक्षण मिळावे आणि किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी सीसीआयची भूमिका महत्त्वाची ठरते.
Related News
पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. केंद्रावर कापसाची गुणवत्ता तपासणी, वजन काट्यावर मोजणी तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी राधाकृष्ण जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे संचालक विनायकराव शेळके, सीसीआय अधिकारी अमित प्रल्हादराव कोहळे, राहुल शेळके, गोपालकृष्ण गोसेवा केंद्राचे अध्यक्ष प्रकाशजी वाघमारे, डॉ. रमेश बरडे, अशोकराव शेळके, बाबाराव सारसे, अभिषेक शेळके, गोपाल पोटे, बंडू छबिले, इंगोले, वासुदेवराव शेळके, कैलास कावरे, मारोती वाघमारे, प्रवीण कावरे, सुदर्शन शेळके, विजय वाघमारे यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सीसीआय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ‘कपास किसान’ मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची व पीक लागवडीची नोंद महसूल विभागाकडून अद्ययावत व प्रमाणित करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत नोंदणी करणे गरजेचे असून, कोणतीही अडचण आल्यास सीसीआय केंद्रावर संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले.
कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने कानशिवणीसह आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सीसीआयमार्फत कापूस विक्री करून शासकीय दराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांकडून करण्यात आले.
