ऑन द स्पॉट रिपोर्ट
पंचनाम्याला कुणी आलं नाही, मदतही मिळाली नाही!
यवतमाळ, दि.२५ : आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठच्या वस्त्यांमध्ये गेलो, तेव्हा नजरेसमोर जे चित्र उभं राहिलं, ते अंगावर शहारे आणणारं होतं. जिल्हाधिकारी विकास मीना काल शेताच्या बांधावर गेले, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, ‘सेवा पंधरवड्या’ला हजेरी लावली. सगळं काही ठरल्याप्रमाणे, प्रोटोकॉलनुसार पार पडलं. पण या औपचारिक दौऱ्याच्या मागे लोकांच्या वेदना आणि शासनाच्या उदासीनतेचं थरारक वास्तव दडलेलं आहे.
पंचनामे कागदावरच
अतिवृष्टीच्या नुकसानीनंतर पंचनामे व्हायला हवे होते. पण तालुक्यातील सहा मंडळ अधिकारी आणि पाच तलाठी त्या दिवसांत दक्षिण भारताच्या ‘आनंदयात्रे’वर होते. ते परतल्यावर २३ सप्टेंबरच्या रात्री घाईघाईने पंचनामे झाले. पण तोपर्यंत मदतीचा जीआर निघून गेला होता. काल जिल्हाधिकाऱ्यांसमोर अनेक शेतकऱ्यांनी टाहो फोडला – “आमचे पंचनामेच झाले नाहीत!” मात्र प्रशासनाला ऐकायला वेळच नव्हता.
घरे उद्ध्वस्त, धान्य वाहून गेलं
आज ‘दैनिक अजिंक्य भारत’चे प्रतिनिधी मनोज माघाडे यांनी बाबा कंबलपोश दर्ग्यापासून ते आठवडी बाजार आणि महाकाली मंदिर परिसरातील पूरग्रस्त वस्त्यांना भेट दिली. घराघरात तीच कहाणी. मातीच्या भिंती कोसळल्या, घरातलं धान्य—गहू, तांदूळ, डाळी—पूरपाण्यात भिजून सडून गेले. भांडीकुंडी वाहून गेली. काही घरं अजूनही धोकादायक स्थितीत आहेत.
मदतीसाठी कोणीच नाही
दोन महिन्यांपासून हा नरकवास सुरू आहे, पण एकही शासकीय कर्मचारी येथे फिरकलेला नाही. आपत्ती नंतर ४८ तासांत मदत मिळायला हवी होती, पण पंचनाम्यालाही अधिकारी गेलेले नाहीत. एका वृद्ध आजीबाईंच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या म्हणाल्या –
“साहेब, दोन महिने झाले, घरात कमरेएवढं पाणी होतं. सगळं वाहून गेलं. जगायचं कसं, तुम्हीच सांगा. कुणी येत नाही आमच्याकडे. जिल्हाधिकारी तालुक्यात आले, पण आमच्या वस्त्या त्यांच्या नकाशावर नाहीत का?”
उत्सव विरुद्ध वास्तव
‘सेवा पंधरवड्या’च्या कार्यक्रमात यंत्रणा उत्साहाने सहभागी होते. फोटो काढले जातात, भाषणं केली जातात. पण पूरग्रस्तांच्या वस्त्यांमध्ये मात्र ‘आपत्तीचा वनवास’ आजही सुरू आहे. लोक तहसीलला धाव घेतात, पण त्यांच्या व्यथांकडे कुणी संवेदनशीलतेने पाहत नाही.आजचा हा ‘ऑन द स्पॉट रिपोर्ट’ हे स्पष्ट दाखवतो—औपचारिक दौर्यांतून शासनाला समाधान मिळत असेल, पण जनतेच्या आयुष्यातली करुण सत्यकथा मात्र अजूनही अनुत्तरित प्रश्नांनी वेढलेली आहे.
read also :https://ajinkyabharat.com/angle-will-become-crores-of-mistress-angle/