अन्नपूर्णा नगरातील नागरिकांचा संताप

नगरातील

२ ऑक्टोबरला ग्रामपंचायतीला ठोकेल कुलूप, निवडणुकांवर बहिष्काराचा इशारा

मुंडगाव – अकोट तालुक्यातील संत नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंडगाव येथील अन्नपूर्णा नगरातील रहिवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने अखेर नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या नगरातील लोकांना आजही रस्ता, पाणी, नाली आणि वीज यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाला दैनंदिन जीवनात नरकयातना सहन कराव्या लागत आहेत. ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या आश्वासनांचा फोल पडदा उघड झाला असून, २ ऑक्टोबर रोजी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षभरानंतरही काम ठप्प!

१५ ऑगस्ट २०२४ रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व सदस्यांनी हस्तक्षेप करून अन्नपूर्णा नगरवासीयांना आश्वासने दिली होती. मात्र आज एक वर्ष उलटूनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही.“आम्हाला दिलेली आश्वासने फक्त कागदावरच राहिली. एकही सुविधा मिळालेली नाही. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे,” असा आरोप नागरिक करत आहेत.

नागरिकांचा ठाम इशारा

“२ ऑक्टोबरपूर्वी रस्त्याचे व इतर कामांचे प्रत्यक्ष स्वरूपात प्रारंभ झाला नाही, तर ग्रामपंचायतीच्या दारावर कुलूप ठोकू. त्याचबरोबर पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकू,” असा इशारा शेख अन्सार (रहिवासी, अन्नपूर्णा नगर) यांनी दिला.

ग्रामपंचायतीचा प्रतिसाद

या निवेदनावर प्रभारी सरपंच तुषार पाचकोर म्हणाले, “निवेदन आम्हाला मिळाले आहे. नागरिकांच्या समस्या गंभीर आहेत. निधी उपलब्ध करून लवकरच तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.”
तर ग्रामपंचायत सचिव गणेश जाधव यांनी स्पष्ट केले, “ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे कामे रखडली आहेत. निधी मिळताच तातडीने सोडवली जातील.”

READ ALSO : https://ajinkyabharat.com/nirchi-trailer-out/